कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता राज्यात तिस-या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतील सेंट जोसेफ आश्रम शाळेतील एकूण 95 विद्यार्थ्यांची कोविड चाचणी करण्यात आली होती. यापैकी 22 विद्यार्थ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या विद्यार्थ्यांना तातडीने शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
आश्रम शाळेत कोरोना
राज्यात संभाव्य तिस-या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येण्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दक्षिण मुंबईत असलेल्या या आश्रम शाळेत विविध वयोगटातील विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याची माहिती समोर येत आहे.
12 वर्षांखालील- 4 विद्यार्थी- नायर रुग्णालयातील पिडियाट्रिक रुग्णालयात भरती
12 ते 18 वर्षांमधील- 11 विद्यार्थी रिचर्डसन क्रूडास रुग्णालयात भरती
७ वर्षांचा बालक- रिचर्डसन क्रूडास रुग्णालयात भरती
(हेही वाचाः धक्कादायक! ‘डेल्टा प्लस’चा अर्ध्या महाराष्ट्राला विळखा!)
तिस-या लाटेसाठी सरकार सज्ज
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तिस-या लाटेसाठी राज्य सरकार आपली पूर्ण तयारी करत असल्याचे सांगितले. कॅबिनेट बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. पहिल्या आणि दुस-या लाटेत लहान मुलांमध्ये कोराना संक्रमणाचे प्रमाण 8 ते 10 टक्के आढळून आले. तसेच मृत्यूचे प्रमाणही अत्यल्प होते. त्यामुळे सध्यातरी चिंता करण्याचे कुठलेही कारण नाही. आश्रम शाळेत कोरोनाबाधित झालेल्या विद्यार्थ्यांना योग्य ते उपचार देण्यात येतील, असे देखील राजेश टोपे यांनी सांगितले.
लसीकरण हाच उपाय
कोरोनाच्या तिस-या लाटेपासून वाचण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय सध्यातरी उपलब्ध असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. त्यानुसार राज्य सरकारने केंद्राकडे लसींच्या पुरवठ्यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यानुसार सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने जास्तीत-जास्त लसींचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे, असेही टोपे म्हणाले. आतापर्यंत महाराष्ट्रात 52 टक्के लोकांना लसींचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर 48 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
(हेही वाचाः राज्य सेवेतील अधिका-यांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा)
Join Our WhatsApp Community