अटक नाट्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारपासून पुन्हा एकदा आपल्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात केली आहे. रत्नागिरीपासून आपल्या यात्रेची पुन्हा सुरुवात करताना त्यांनी शिवसेनेवर नाव न घेता टीका केली आहे. सध्या काही जणांना सत्तेची मस्ती चढली आहे. पण नारायण राणेच्या मागे लागू नका, तुम्हाला ते परवडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सत्तेची मस्ती दाखवण्याचा प्रयत्न
जन आशीर्वाद यात्रेदरम्यान जे काही घडले त्यात मी कोणताही गुन्हा केलेला नाही. पण जबरदस्तीने आपण सत्तेत आहोत, ती सत्तेची मस्ती दाखवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. काही हरकत नाही, दाखवू द्यात. आम्ही काही आयुष्यभर विरोधी पक्षात बसायला जन्माला आलेलो नाही. केंद्रात आमची सत्ता आहेच, पण भविष्यात राज्यातही आमची सत्ता येईलच. राज्यात आज कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न आहे. सुशांत सिंग राजपूतची हत्या करण्यात आली. दिशा सालियनच्या हत्येचे गुन्हेगार अजून सापडलेले नाही आणि ते सापडणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे वरिष्ठांचे काहीही आदेश आले तरी कायद्याच्या बाहेर जाऊन काहीही करू नका असे मला पोलिसांना सांगायचे आहे. नाहीतर नंतर होणा-या कारवाईला सामोरे जावे लागेल असेही त्यांनी सांगितले आहे.
(हेही वाचाः पुन्हा आला तर वरुण माघारी जाणार नाही! नारायण राणेंचा इशारा)
…तर तुम्हाला परवडणार नाही
नारायण राणेच्या मागे लागून नका, नाहीतर आता मी थोडंच बोलतोय नंतर सगळंच बोलायला लागेन, ते तुम्हाला परवडणार नाही, असा धमकीवजा इशाराही त्यांनी दिला आहे. आधीच्या केसेस काढू असं सांगत आहेत, जर मी इतकाच गुन्हेगार होतो तर मला मुख्यमंत्री कसं काय केलं. शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, खासदार अशी अनेक पदे मी शिवसेनेत भूषवली तेव्हा मला कोणीही विरोध केला नाही.
बंधने फक्त नारायण राणेंसाठीच
देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत, हीच यांची ख्याती आहे. सभा घेऊ नका, इथे जाऊ नका ही बंधने फक्त नारायण राणेंसाठीच आहेत. आमच्या देशात आम्हाला अशी मनाई का? त्यामुळे त्यांनी कितीही विरोध केला तरी त्याची आम्हाला पर्वा नाही, असेही त्यांनी सांगितले.
(हेही वाचाः ‘आजही राणेंमुळे शिवसेनेत पदं मिळतात…’ असं का म्हणाले नितेश राणे?)
घाबरणं हे रक्तात नाही
आपल्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे समाचार घेतला. गुन्हे दाखल करुन नारायण राणे घाबरेल असे त्यांना वाटले होते. पण घाबरणं हे माझ्या रक्तात नाही, त्यामुळे याचा मला काहीही फरक पडत नाही, असे आक्रमक विधानही नारायण राणे यांनी यावेळी केले.
घरात बसून सत्ता चालत नाही
जगाच्या पाठीवर घरात राहून, पिंज-यात राहून कधी कोणी सत्ता चालवल्याचे उदाहरण पाहिले नाही, अशी टीका नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे नाव न घेता केली आहे. मंत्रालयात जायचं नाही, कॅबिनेटला हजर राहायचं नाही. फक्त वर्षावर गप्पा मारण्यासाठी जायचं असंच सध्या चालू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
(हेही वाचाः बॉडीगार्डला बिग बींनी केले ‘करोडपती’? पोलिस आयुक्तांनी केली ‘बदली’)
कोकणासाठी काम करणार
सिंधुदुर्गात 200 कोटींचे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे. कोकणातील माणसाला व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण नक्कीच प्रोत्साहन देणार आहोत. कोकणाच्या औद्योगिक विकासासाठी केंद्रीय मंत्री म्हणून नक्कीच काम करणार आहे, असे आश्वासन नारायण राणे यांनी दिले. या दोन वर्षांत सरकारने कोकणाला दिले? रत्नागिरीत तर शिवसेनेची सत्ता आहे. तरीही रत्नागिरीची काय अवस्था आहे. त्यामुळे या गोष्टी आपण समोर आणणार आहोत, असे राणेंनी स्पष्ट केले.
कोकणी माणसाला शिवसेनेने न्याय दिला नाही
शिवसेना कोकणी माणसाने उभी केली आहे, तेव्हा फक्त कोकणी माणूसच होता. आता सगळे पाहुणे आहेत, असेही विधान नारायण राणे यांनी केली. कोकणातून शिवसेनेचे आमदार निवडून जातात पण विधानसभेत ते बोलताना दिसत नाहीत. शिवसेनेत सध्या फक्त जमवा आणि भागीदारी द्या, असं काम सुरू आहे. कोकणाला न्याय द्यायचा नाही, हेच सध्या दिसत आहे.
(हेही पहाः ऐका ‘सत्ता-नारायणा’ची कथा…)
Join Our WhatsApp Community