नारायण राणेंनी आमच्या कुंडल्या काढण्याची धमकी दिली, खुशाल काढा, तुम्हाला कुंडल्या नाहीत का?, ज्या दिवशी आम्ही आमची संदूक उघडू. त्यावेळी बरेच काही बाहेर पडेल, पण आम्ही आमची सभ्यता पाळतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा मान जर तुम्ही पाळणार नसाल, तर तुम्ही मराठी नाही आणि मराठाही नाही, असेच म्हणावे लागेल, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी नाशिक येथे पहिला गुन्हा दाखल झाला, त्यानंतर राणे यांना अटक झाली, त्यानंतर राज्यभर वाद निर्माण झाला. त्यावेळी नाशिक येथील भाजपाच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी दगडफेक केली. त्या शिवसैनिकांचे कौतुक करण्यासाठी संजय राऊत नाशिक येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कायद्याने लगाम लावण्याची गरज होती!
नाशिकमधून जो वाद उठला ते शमले नाही. कायदेशीर कानफटात मारली जाईल, अशी आता भीती वाटू लागली आहे. आपल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे ठाकरे संस्कार आहेत, उगाच अंगावर आले तर सोडणार नाही, केंद्रीय मंत्री भारती पवार, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचीही जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. पण हे तिन्ही मंत्री मुख्यमंत्री, राज्य सरकारवर टीका करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन मंत्र्यांनी आपापल्या भागात जाऊन सरकाराच्या कामाचा प्रचार करण्याची जबाबदारी दिली आहे, पण यात एक अतिशहाणा निघाला आहे. नारायण राणे हे पंतप्रधान मोदी आणि भाजप यांचा आदेश पाळत नाही, मोदींचा प्रचार न करता ते शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर टीका करत आहेत. आमचे शरीर, मन हे असे घाव, हल्ले सहन करत आले आहे. शेवटी काय झाले, एकदा कायद्याने लगाम घालण्याची गरज होती, तो मुख्यमंत्र्यांनी घातला. मंत्र्यांनी घटनेची शपथ घेतली, त्यांनी सभ्यता आणि पदाची प्रतिष्ठा पाळण्याची गरज आहे, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशात गौरव का होतो, कारण ते संयमाने आणि माणुसकीने वागतात म्हणून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल होत आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
(हेही वाचा : राणेंमुळे भाजप दहाफूट मागे जाईल! संजय राऊतांचा इशारा)
उतमात सहन करणार नाही!
शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडले, पण राणेंसारखे उतमात कुणी केला नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे यापुढे हा उतमात सहन करू नका, असे सांगितले आहे. शिवसैनिकांना हातात दगड का घ्यावा लागला, त्याचे आत्मपरीक्षण भाजपाने करावे, ज्या दिवशी नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल झाला त्यावेळी पुढल्या तासाभरात काय होईल हे कुणाला माहीत नव्हते. पण नाशिकने ते करून दाखवले, कारण या पुढे नाशिक भविष्यात राज्याला मार्गदर्शक ठरेल, नाशिक महापालिका जिल्हा परिषद ही आपली प्रतिष्ठा बनली पाहिजे, ती शिवसेनेकडे आली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. आपला शाळेत कधी पहिला नंबर आला नाही, पण समाजकारण, राजकारणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्या क्रमांकावर आले. पहिल्या पाचात एक तरी भाजपचा मुख्यमंत्री आहे का, असेही राऊत म्हणाले.
असेच करेक्ट कार्यक्रम करत राहू!
सत्ता मनगटात असते, मी मुंबईत राहतो पण एकदाही मंत्रालयात फिरकत नाही, सत्ता म्हणजे पदावर बसणे हे मी मानत नाही. प्रसंगी छातीवर वार झेलण्याची हिमंत ही सत्ता असते. सत्ता बाळासाहेब ठाकरेंची होती, शेवटच्या क्षणांपर्यंत बाळासाहेबांची सत्ता होती, शेवटच्या क्षणी ४०-५० लाख लोक जमले होते, असे सांगत नाशिकचे वातावरण पूर्ण शिवसेनामय बनले आहे, ही ऊर्जा अशीच ठेवा. अजून असे अनेक करेक्ट कार्यक्रम करू. आपल्याला असे कार्यक्रम करण्याची सवयच आहे. त्यानंतरच्या परिणामांची आपण पर्वा करत नाही, असेही राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community