परेल हिंदमाता आणि मडके बुवा चौकात तुंबणाऱ्या पाण्यावर रामबाण उपाय शोधण्यात आला आहे. येथील तुंबणारे पाणी तिथे बांधलेल्या पिटमधून थेट दादर पश्चिम प्रमोद महाजन उद्यान आणि परेल सेंट झेवियर्स मैदानात बांधलेल्या टाकीत वळवण्याचे अंतिम टप्प्यात आहे. हे काम पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण होणार असून याची चाचणी करण्यासाठी आता महापालिकेला प्रतीक्षा आहे ती मोठ्या पावसाची. त्यामुळे येणाऱ्या मोठ्या पावसात खऱ्या अर्थाने हा रामबाण उपाय किती प्रभावी ठरतो याकडे सर्वांचे लक्ष असून प्रत्यक्षात हे काम केले तरी याठिकाणी अर्धा फुटापेक्षा कमी पाणी कायमच राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
हिंदमाता जवळील तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ज्या भूमिगत टाक्या, रेल्वेखालील टनेल आणि पर्जन्य जलवाहिनी आदींची कामे अगदी शेवटच्या टप्प्यात आहेत. यामध्ये दीड तासापर्यंतच्या पावसाचे पाणी भूमिगत टाक्यांमध्ये साठवून ठेवू शकतो. म्हणजे तासाला १००मि.मी. पाऊस पडला तरी पाणी तुंबणार नाही. या टाक्यांची क्षमता वाढवली जाणार आहे. सध्या एक तृतीयांश काम पूर्ण झाले आहे. भविष्यात उर्वरीत दोन तृतीयांश कामेही पूर्ण केली जातील. त्यामुळे भविष्यात चार तासांमध्ये प्रति तास १०० मि.मी पाऊस पडला तरी येथे पाण्याचा निचरा होवू शकतो. पण अर्धा फुटापर्यंतचे पाणी तुंबूनच राहणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर याची योग्यप्रकारे चाचणी होवू शकते. त्यामुळे एका मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
– पी.वेलरासू, अतिरिक्त आयुक्त(प्रकल्प), मुंबई महापालिका
मागील वर्षी पाण्याचा निचरा होण्यासाठी ३ ते ४ तास लागलेले
हिंदमाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर आणि परळमधील मडके बुवा चौक आदी भागात मागील वर्षी २०२० च्या पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी ३ ते ४ तासांचा कालावधी लागला होता. समुद्रातील भरतीच्या वेळेत जर पाऊस जास्त पडला, तर अनेकदा ३ ते ४ फूट पाणी साचते. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी संबंधित उपाययोजना म्हणून दादर पश्चिम प्रमोद महाजन उद्यानात ६० हजार घनमीटर व सेंट झेवीयर्स मैदानात ४० हजार घनमीटर क्षमतेचे पाणी साठवण्याच्या टाक्या उभारण्याचा निर्णय घेतला. परंतु २०२१ चा मान्सून पूर्व कालावधी विचारात घेता या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे १५ हजार आणि १० हजार घनमीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या विचारात घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी महापालिकेने एन.टी.एस. इंजिनिअरिंग यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. या सल्लागाराच्या अहवालानुसार हिंदमाता परिसरात ३००० घनमीटर प्रतितास क्षमतेचे १० पंप आणि मडके बुवा परिसरात ३००० घनमीटर प्रतितास क्षमतेचे ०५ पंप बसवण्याची शिफारस केली आहे.
(हेही वाचा : कोळीवाड्यांच्या विकास: स्वतंत्र नियमावलीकडे शासनाचे दुर्लक्ष)
पुढील आठ दिवसांमध्ये काम पूर्ण होईल!
हिंदमाता परिसरातील १० पैकी ०८ पंप हिंदमाता पुलाखाली बसविण्यात आलेल्या पिट मधील पाणी उपसा करून १२०० मि. मी रायझिंग वाहिनीतून प्रमोद महाजन उद्यान टाकीत सोडण्यात येईल. आणि दोन पंप उद्यानातील टाकीत जमा झालेले पाणी दादर पश्चिम येथील सेनापती बापट मार्ग येथील पावसाळी पाणी वाहून नेण्याऱ्या वाहिनीत सोडण्यासाठी वापरण्यात येणार आहे. तर मडकेबुवा चौक परिसरातील असणाऱ्या ५ पंपा पैकी ३ पंप वापरात असलेल्या पिट मधील पाणी उपसा करून ९०० मि.मी व्यासाच्या रायझिंग वाहिनीतून सेंट झेवीयर्स टाकीत सोडण्यासाठी तर २ पंप हे या टाकीतून पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीत सोडण्यासाठी वापरण्यात येणार, अशी संकल्पना आहे. याबाबतचे टाटा मिल्समधून रेल्वे रुळाखालील टनेलचे काम जवळपास पूर्ण झाले असून भूमिगत टाक्या, टनेल आदींना जोडणाऱ्या पर्जन्य जलवाहिनींच्या जोडणीचे काम सुरु आहे. हे काम पुढील आठ दिवसांमध्ये पूर्ण होईल. त्यानंतर या निचरा करण्यात येणाऱ्या प्रयोगाची चाचणी घेण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community