गो…गो..गो..गोविंदा… गोविंदा आला रे आला मटकी संभाल ब्रिजबाला. दहीहंडीच्या दिवशी हा एकच जल्लोष मुंबई-ठाण्यामध्ये पहायला मिळतो. मुंबई-ठाण्यातील ही दहीहंडीची क्रेझ सातासमुद्रापार देखील पोहोचली आहे. मात्र कोरोना संकटामुळे गेल्या वर्षीपासून घागर उताणीच राहिली आहे. यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संकटामुळे सरकारने निर्बंध घातले आहेत, त्यामुळे यंदाही गोविंदा नाराज आहेत. 31 ऑगस्टला गोपाळकाला आहे, त्यामुळे यावर्षीही मोठ्या दहीहंड्या मुंबई-ठाण्यात पहायला मिळणार नाहीत. मात्र मुंबई-ठाण्यातील दहीहंड्यांची खरी चर्चा झाली ती राजकीय नेत्यांच्या दहीहंड्यांमुळे. मुंबई-ठाण्यातील त्या प्रमुख राजकीय दहीहंड्या कोणत्या होत्या, ज्याची सर्वाधिक चर्चा झाली ते पाहुयात.
(हेही वाचाः दहीहंडी, गणेशोत्सव सुपर स्प्रेडर बनतील! असे का म्हणाले केंद्र सरकार?)
आव्हाडांच्या हंडीने मिळाले ग्लॅमर
ठाणे आणि मुंबईमध्ये मोठी बक्षिसांची रक्कम आणि उंच थरांच्या दहीहंड्या लावण्याची सुरुवात करणाऱ्या राजकारण्यांपैकी एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड. दहीहंडीचा उत्सव आजसारखा लोकप्रिय होण्याआधी ठाण्यातील लोकप्रिय असणाऱ्या दोन दहीहंड्यांपैकी पहिली म्हणजे टेंभी नाक्याला आनंद दिघे आयोजित करायचे ती शिवसेनेची दहीहांडी आणि दुसरी पाचपाखाडी येथील ओपन हाऊसच्या चौकात लागायची ती जितेंद्र आव्हाड यांची हंडी. 2014 मध्ये तर जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानने दहाव्या थराला 25 लाखांचे बक्षिस ठेवले होते. नऊ थर लावणार्यांना 15 लाख, आठ थर लावणार्या पथकाला एक लाखाचे, तर सात थर लावणार्या पथकाला 25 हजार रुपयांचे बक्षिस ठेवले होते. विषेश म्हणजे जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानने महिला दहीहंडीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी महिला पथकांना स्वतंत्र बक्षीसे ठेवली होती. तर सात थर लावणार्या महिला पथकांना एक लाख रूपये तर सहा थर लावणार्या महिला पथकांना 25 हजार रुपये अशी बक्षीसे ठेवली होती. विशेष म्हणजे आव्हाडांच्या दहीहंडीमध्ये सेलिब्रेटी देखील मोठ्या संख्येने हजेरी लावत होते.
(हेही वाचाः गो… गो… गो… ‘गोविंदा’ नाही, तर गो ‘कोरोना’ गो! दहीहंडीबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?)
राम कदमांची दहीहंडी
जितेंद्र आव्हाड यांच्या दहीहंडी प्रमाणे भाजप आमदार राम कदम यांच्या दहीहंडीची देखील सर्वाधिक चर्चा झाली. लाखोंची बक्षीसे राम कदम यांनी आपल्या दहीहंडीत ठेवली. एवढेच नाही तर त्यांनी बॉलिवूडचे मोठमोठे सेलिब्रेटीदेखील राम कदम यांच्या दहीहंडीला हजेरी लावत असत. मात्र 2018 मध्ये दहीहंडी दरम्यान राम कदम यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राम कदम यांची दहीहंडी चांगलीच वादग्रस्त ठरली. दहीहंडीच्या कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून ‘तुमच्यासाठी प्रसंगी एखादी मुलगीही पळवून आणीन,’ असे वादग्रस्त वक्तव्य केले हाेते. जर तुम्हाला एखादी मुलगी आवडली तर तुमच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे या. त्यांनीही हाेकार दिला तर संबंधित मुलीला पळवून मी तुमच्याकडे आणून देईन. हे चुकीचे असले तरी तुमच्यासाठी मी करीन, असे वक्तव्य राम कदम यांनी केले होते. यंदा राज्य सरकारने दहीहंडीवर निर्बंंध आणले असताना देखील राम कदम हे दहहंडी साजरी करणार आहेत. बिअर बारला नियम लावता येतात, तसे नियम तुम्ही मंदिरे आणि उत्सव साजरे करताना का लावत नाही? सरकारने कितीही अडवले तरी घाटकोपरमध्ये उत्सव साजरा होणार, आम्ही सरकारचा कुठलाच फतवा मानणार नाही असे म्हणत यंदा दहीहंडी साजरी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
संकल्पच्या हंडीचीही क्रेझ
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादीचे माजी नेते आणि आता शिवसेनेत असलेल्या सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीचीही सर्वाधिक क्रेझ ही गोविंदांमध्ये होती. जांभोरी मैदानावर बांधण्यात येणारी ही हंडी फोडण्यासाठी दहीहंडी पथकामध्ये चढा-ओढ असायची. मात्र गेल्या वर्षी राज्यावर असलेल्या कोरोना संकटामुळे सचिन अहिर यांची दहीहंडी देखील होणार नाही.
(हेही वाचाः जन आशीर्वाद यात्रेमुळे राज्यात कोरोना वाढणार… दादांचे भाकीत)
सरनाईकांची संस्कृती युवा प्रतिष्ठान
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीची सर्वाधिक चर्चा असते. ठाण्याची ही दहीहंडी जगप्रसिद्ध आहे. मात्र कोरोना संकटामुळे ठाण्यात यावेळी संस्कृती प्रतिष्ठानचा दहीहंडी ऊत्सव रद्द करुन त्याऐवजी आरोग्य ऊत्सव साजरा करणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
अविनाश जाधवांची दहीहंडी
मनसेचे ठाण्याचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या देखील दहीहंडीची चर्चा असते. मात्र गेल्या वर्षीपासून असलेल्या संकटामुळे या हंडीवर देखील त्याचा परिणाम झाला होता. मात्र यंदा कोणत्याही परिस्थितीत दहीहंडी साजरी करण्याचा निर्णय अविनाश जाधव यांनी घेतला आहे. कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही दहीहंडी करणारच तसेच गोविंदा पथकाच्या मागे उभे राहणार असे अविनाश जाधव यांनी सांगितले.
(हेही वाचाः कोळीवाड्यांच्या विकास: स्वतंत्र नियमावलीकडे शासनाचे दुर्लक्ष)
Join Our WhatsApp Community