राज्य सरकारने दहीहंडी साजरी करण्यास प्रतिबंध केला आहे. मात्र सरकारचा हा आदेश धुडकावून दहीहंडी साजरी करणारच, असा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी घेतला आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले. त्यामुळे ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अविनाश जाधव यांनी फेसबुकवरून टीका केली असून, पुन्हा एकदा घर कोंबड्यानी करून दाखवलं, अशी टीका अविनाश जाधव यांनी केली आहे.
दरम्यान आम्हाला दहीहंडी उत्सव नियमांचं पालन करुन साजरा करु द्यावा, अशी मनसेचे मागणी आहे. आज सकाळपासूनच भगवती मैदानावर मनसेने तयारी सुरु केली. या मैदानामध्ये स्टेज उभारण्यात येत होता. मात्र सकाळपासूनच पोलिसांनी या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. अखेर सव्वा अकराच्या सुमारास येथे पोलिसांच्या मोबाईल व्हॅन्स दाखल झाल्या आणि त्यानंतर जाधव यांच्यासहीत पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी राज ठाकरेंचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या, तसेच उद्धव ठाकरेंविरोधातही घोषणाबाजी झाली.
तरीही दहीहंडी साजरी होणार!
आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. दहीहंडी साजरी होणारच. आम्ही कायदा हातात घेतला नाही. आम्हाला नियम द्या, आम्ही नियमांचं पालन करून दहीहंडी साजरी करायला तयार आहोत, असे अविनाश जाधव यांनी सांगितले. मुख्यमंत्री फक्त हिंदू सणांवर निर्बंध घालतात. त्यापेक्षा उपाययोजना केल्या असत्या तर बरं झालं असत, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा असो किंवा शिवसेनेने केलेली आंदोलन असो त्यावेळी कोरोना कुठे गेला होता? शिवसैनिकांना कोरोना होत नाही का?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.
Join Our WhatsApp Community