मागील आठवडाभरापासून राज्यात जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून कायम चर्चेत राहिलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेने अंगावर घेतले. त्यामुळे बरीच वादावादी झाली. रविवारी, २९ ऑगस्ट रोजी ही जन आशीर्वाद यात्रा संपली, मात्र नारायण राणेंच्या मागील पोलिसांचा त्रास सुरूच राहिला आहे.
अलिबाग येथे पोलिस ठाण्यात जावे लागणार!
नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या वेळी महाड येथे पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अवमानकारक टीका केली. त्यामुळे नाशिक येथे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर महाड येथेही गुन्हा दाखल झाला. पुढे नाशिक येथून पोलिसांचे पथक राणे यांना अटक करण्यासाठी कोकणच्या दिशेने निघाले. तेव्हापासून अटक नाट्य चांगलेच रंगले होते. राणे यांना अखेर पोलिसांनी संगमेश्वर येथे अटक केली आणि त्यांना महाड येथील न्यायालयासमोर सादर केले होते. त्यावेळी न्यायालयाने राणेंना सशर्त जामीन मंजूर केला. त्यावेळी राणे यांना अलिबाग येथील पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. सोमवारी, ३० ऑगस्ट रोजी अलिबाग येथील पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. तसा आदेश न्यायालयाने दिला होता.
राणे न्यायालयात हजर राहणार का?
दरम्यान नारायण राणे हे न्यायालयात हजर राहणार का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. जन आशीर्वाद यात्रा संपली तरी राणेंच्या मागील पोलिसांचे शुक्लकाष्ट सुरुच राहणार का? राणे यांनी त्यांच्या वरील गुन्हे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे. आपल्यावर लावण्यात आलेले गुन्हे चुकीचे आहेत, असा दावा राणेंचा आहे.
Join Our WhatsApp Community