महाराष्ट्रातील मॉल उघडले असतील तर मग मंदिरं का नाही असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला विचारला. त्र्यंबकेश्वर येथील पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते.
"धार्मिक स्थळं उघडायला हवीत परंतु धार्मिक स्थळं उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय? त्याची एक नियमावली ठरवावी लागेल, मी…
Posted by मनसे वृत्तांत अधिकृत on Monday, August 17, 2020
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे
नियमावली आली तर ती सर्वांसाठी असेल. मंदिरं उघडण्यात यावी ही मनसेची भूमिका आहेच, पण जर लोकांची झुंबड आली तर ती कशी नियंत्रणात आणणार? हा प्रश्नही आहेच. मंदिरे खुली झाली आणि गर्दी झाली तर नियोजन कसं करणार? धार्मिक स्थळं उघडली तर त्यात फक्त मंदिरं नसतील तर इतर धार्मिक स्थळंही असतील. आपण सर्व नियम पाळले पण इतरांनी नाही पाळले तर काय करणार? त्यामुळे राज्य सरकारने याबाबत नियमावली तयार करायला हवी, अशी मागणी देखील राज ठाकरे यांनी केली आहे.
धार्मिक स्थळे खुली करण्याची रोहित पवारांचीही मागणी
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही धार्मिक स्थळं खुली करण्याची मागणी केली होती. त्यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं होतं. ‘मंदिरं आणि धार्मिक स्थळं लोकांसाठी खुली करायला पाहिजेत, असं माझंही म्हणणं आहे. कारण त्या भागात असलेल्या अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्यामुळं याबाबत मी जरूर पाठपुरावा करील’, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
Join Our WhatsApp Community