सायकल ट्रॅकचा मार्ग खडतर, दुसऱ्या टप्प्यातील काही भागांत अतिक्रमणाचा अडसर!

मुंबईत जलवाहिनी लगतच्या रस्त्यांवर सायकल ट्रॅक बनवून आसपासच्या परिसराचे सुशोभिकरण करण्याचे काम चार टप्प्यात हाती घेण्यात आले आहे.

132

मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या सायकल ट्रॅकची हवा आता खुद्द प्रशासनच काढून त्याला पंक्चर करण्याच्या विचारात आहे. दुसऱ्या टप्प्यात हाती घेतलेल्या सायकल ट्रॅकच्या मार्गातील अतिक्रमणे हटवण्यावर कोट्यवधी रुपये खर्च होणार असल्याने प्रशासनाने तेथील काम थांबवून जिथे मोकळा भाग असेल तेथीलच काम सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेच्या सायकल ट्रॅकचा मार्ग खडतर बनला आहे.

चार टप्प्यांत सायकल ट्रॅकचे काम 

मुंबईत जलवाहिनी लगतच्या रस्त्यांवर सायकल ट्रॅक बनवून आसपासच्या परिसराचे सुशोभिकरण करण्याचे काम चार टप्प्यात हाती घेण्यात आले आहे. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे लोकलची सेवा, तसेच मुंबई मेट्रो, मोनो रेल, पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व मुक्त मार्ग यासारख्या पर्यांयांव्यतिरिक्त मुंबईतील अंतर्गत वाहतुकीला एक नवा पर्याय देण्यासाठी जलवाहिनीलगत ३९ किमी लांबीच्या सायकल ट्रॅकचे काम चार टप्प्यात हाती घेण्यात आले आहे.

(हेही वाचा : कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावत अंधेरी, मुलुंडमधील तरण तलावांचे खासगीकरण?)

१२३ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले!

पहिल्या टप्प्यात मुलुंड ते अंधेरी सहार रोड या १४.१० किलोमीटरच्या पट्टयात हे सायकल ट्रॅक उभारण्यासाठी महापालिकेने पी.डी. अर्थमुव्हर्स या कंत्राटदाराची निवड केली. यामध्ये सर्व करांसह १६१ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात एन, एम पश्चिम विभाग, एफ दक्षिण विभाग व एच पूर्व विभागातील मुख्य जलवाहिनींलगत १२ किलोमीटर लांबीचे काम स्काय वे इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीला ९७.२९ कोटी रुपयांना देण्यात आले आहे. टप्पा २ ब अंतर्गत एल व जी उत्तर विभागातील जलवाहिनी लगत सायकल ट्रॅक बनवण्याच्या कामांसाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली. टप्पा २ ब अंतर्गत ९.८ किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक व अन्य प्रकारच्या कामांसाठी बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कामांसाठी विविध सेवाकरासह १२३ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.

पुनर्वसनावर कोट्यवधी खर्च 

मात्र, यातील पहिल्या टप्प्यातील काम सुरळीत सुरु असून दुसऱ्या टप्प्यामध्ये काही भागांमध्ये अतिक्रमण असल्याने त्याच्या पुनर्वसनावर कोट्यवधी रुपयांचा खर्च येत असल्याने या मार्गातील ट्रॅकचे काम बाजुला ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सायकल ट्रॅकच्या दुसऱ्या टप्प्यातील काही भागांमध्ये कमर्शियल अतिक्रमणे आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च येणार असल्याने ते महापालिकेला आता परवडणारे नाही. त्यामुळे जिथे जिथे हा मार्ग मोकळा आहे, तेथील सायकल ट्रॅकचे काम सुरु राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.