शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शाळांमधील भौतिक सुविधांचा तसेच शैक्षणिक गुणवत्तेचा विकास करुन आदर्श शाळांची निर्मिती केली जाईल, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे.
काय आहे निर्णय?
भौतिक सुविधांच्या विकासामध्ये स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीत असलेले वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, ICT लॅब, सायन्स लॅब, ग्रंथालय यांसारख्या सुविधांचा समावेश राहील. तर शैक्षणिक गुणवत्तेमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उत्तम शैक्षणिक पोषक वातावरण उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतील याकडे लक्ष देण्यात येईल. शाळेच्या ग्रंथालयामध्ये पूरक वाचनाची पुस्तके आणि संदर्भ ग्रंथ, एनसायक्लोपिडिया उपलब्ध असतील. स्वअध्ययनासोबतच गट अध्ययनासारखे रचनात्मक पद्धतीचे शैक्षणिक कार्यक्रमही याअंतर्गत राबवले जातील.
(हेही वाचाः 1 सप्टेंबरपासून बेस्ट बसच्या मार्गांत बदल! कोणते मार्ग सुरू, कोणते बंद? वाचा)
४९४ कोटी रुपयांचा निधी
आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये २१व्या शतकातील कौशल्यांचा विकास होईल याकडे विशेषत्वाने लक्ष दिले जाईल. यामध्ये नवनिर्मितीला चालना देणारे, समीक्षात्मक विचार, वैज्ञानिक प्रवृत्ती- संविधानिक मूल्ये अंगी बाणवणारे, सोबत काम करण्याचे कौशल्य तसेच संभाषण कौशल्य यासारखी अन्य कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात येतील. आज मंजूरी देण्यात आलेल्या ४८८ “आदर्श शाळा”च्या विकासासाठी ४९४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
Join Our WhatsApp Community