गेल्या वर्षीपासून सुरू असलेला राज्यपाल नियुक्त आमदारांचा तिढा सुटलेला नसून, आता एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांचे नाव यादीतून कट करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. राजू शेट्टी यांचे नाव राष्ट्रवादीने आपल्या यादीतून का काढून टाकले, अशी चर्चा रंगलेली असतानाच आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे. वारंवार राज्य सरकार विरोधात केलेल्या आंदोलनामुळेच राजू शेट्टी यांचे नाव यादीतून काढून टाकल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळत आहे.
आपण याबाबत कधीच पाठपुरावा केला नाही. आपल्याला यात फारसा सर राहिलेला नाही. राज्यपालांनी जो काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा, मला फरक पडत नाही.
– राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते
राष्ट्रवादीवर टीका करणे पडले महागात
राजू शेट्टी यांनी नुकताच पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. या मोर्चात हजारोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी राजू शेट्टी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. जे सूर्याला दिसत नाही ते जयंत पाटील यांना दिसते. मोठ्या योजना आणून टेंडर काढण्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना रस आहे, अशी घणाघाती टीका शेट्टी यांनी केली होती. एवढेच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार फक्त आश्वासने देऊन गेले. ज्यांना शेती कळत नाही त्यांनी मदत केली. मात्र, ज्यांना ती कळते त्यांनी मदत द्यायला टाळाटाळ केली, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला होता.