काँग्रेस स्वबळाचा निर्धार पक्का! मुंबईत २२७ जागा काँग्रेस लढवणार

महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवत महापौरही आपलाच होणार हेही त्यांनी सांगितले.

116

आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल बुधवारी काँग्रेस पक्षाने वाजवले. राज्यातील महाविकास आघाडीसोबत सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाने आजवर स्वबळाची घोषणाबाजी केली असली, तरी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकताना काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईत २२७ जागा लढवणार असे सांगत आपला पक्ष स्वबळावरच लढणार असल्याचे स्पष्ट केले. सध्या काँग्रेस पक्षासाठी अनुकूल वातावरण आहे, त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागा असे सांगत या महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवत महापौरही आपलाच होणार हेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस ठरला नंबर-१

मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नगरसेवक रवी राजा यांना प्रजा फाऊंडेशनने उत्कृष्ट नगरसेवक म्हणून गौरव करत पहिला क्रमांक दिला आहे. तर मालाडमधील काँग्रेस नगरसेवक विरेंद्र चौधरी आणि अंधेरी पश्चिम येथील काँग्रेस नगरसेविका मेहर हैदर यांचा क्रमांक पहिल्या दहामध्ये आला आहे. महापालिकेतही पहिल्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष आल्याने तसेच पहिल्या दहामध्ये काँग्रेसचे तीन नगरसेवक आल्याने, त्यांचा सत्कार मुंबई काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगती बोलताना भाई जगताप यांनी २०२२ची मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असून, २२७ जागांवर उमेदवार उभे केले जाणार असल्याची घोषणा केली.

(हेही वाचाः महापालिका निवडणूक : प्रभाग रचनेच्या कच्चा आराखडा बनवण्याच्या कामाला सुरुवात)

महापालिकेत स्वबळानेच लढणार

आमच्या पक्षाचे तीन नगरसेवक टॉप टेनमध्ये येणे आणि आपला पक्ष महापालिकेत पहिल्या क्रमांकावर येणे हे पक्षाचा मुंबई अध्यक्ष म्हणून माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले. राज्यात आम्ही महाविकास आघाडी म्हणून सरकारसोबत असलो, तरी महापालिकेत आम्ही विरोधक म्हणून काम करत आहोत आणि राहणार यात कोणतीही शंका नसावी, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही २२७ जागांवर आमचे उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नगरसेवकपद नाही मिळाले, पण आमदार झाली

आपण २००२ मध्ये आपण नगरसेवक पदाची उमेदवारी मागितली होती, पण पक्षाने दिली नाही. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळाली आणि मी आमदार म्हणून निवडून आले, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. उमेदवारी दिली नाही म्हणून मी पक्ष सोडला नाही, तर पक्षाशी प्रामाणिक राहिले म्हणून मंत्री बनले. त्यामुळे २०२२च्या निवडणुकीसाठी सर्वांनी कामाला लागावे. आम्ही कामे करायला तयार आहोत, पक्षाने आमच्यावरही जबाबदारी टाकावी. स्वत:पासून जबाबदारी स्वीकारायला प्रत्येकाने सुरुवात करायला हवी, असे त्यांनी सांगितले.

(हेही वाचाः महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा सेना फ्रंट लाईनवर: वरुणाच्या नेतृत्वाखाली युवा सज्ज)

…तर आम्हीही टॉप-१० मध्ये असतो- शेख

भाई जगताप हे पाच वर्षांपूर्वी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बनायला हवे होते, म्हणजे आमचाही याठिकाणी प्रजाच्या अहवालात टॉप टेनमध्ये आल्याबद्दल सत्कार झाला असता, असे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. तसेच पक्षाचे अध्यक्ष जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करू. महापालिकेच्या बैठका या थेट न होता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होत असल्याची विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केलेल्या खंत, याबाबतही शेख यांनी आपण याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू, असे आश्वासन दिले.

काँग्रेसचाच महापौर होणार- राजा

हमारे नगरसेवक है कम, पर हममें है दम… अशी भाषणाची सुरुवात करत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी यापूर्वीचे मुंबई अध्यक्ष राहिलेल्या स्वर्गीय मुरली देवरा, गुरुदास कामत यांचे स्मरण केले. तसेच आपण २५ वर्षे नगरसेवक असून प्रथमच आपल्याला पहिला क्रमांक मिळालेला आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस शिवाय मुंबईचा महापौर बनू शकत नाही, असे सांगत राजा यांनी प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आणि कामांमुळेच आपण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. निवडणुकीसाठी केवळ १५० दिवस उरले असून, प्रत्येकाने मतभेद विसरुन कामाला लागावे असेही आवाहन त्यांनी केले. पक्षाचे चरणजित सप्रा यांनी १९९५च्या पूर्वीप्रमाणे पुन्हा एकदा महापालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकलेला पाहायला मिळायला हवा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

(हेही वाचाः मुंबई महापालिकेत काँग्रेसने शिवसेनेला टाकले मागे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.