शिवसेना आणि विशेषतः ठाकरे घराण्याच्या भाषेत ‘खंजीर’ हा शब्द कायम वापरात येतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब असो कि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असोत, त्यांच्या भाषणांमध्ये विश्वासघात करणाऱ्यांचा उल्लेख करताना ‘पाठीत खंजीर खुपसला’, असा शब्द प्रयोग हमखास होतो. तोच शब्दप्रयोग भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत केला. त्यामुळे शिवसेनाही आता यावर प्रत्युत्तर देवू लागली आहे. यानिमित्ताने ‘खंजीर कुणी खुपसला?’, यावरुन शिवसेना आणि भाजपा यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडून आलेले काही लोक दररोज सकाळी ब्रशही न करता त्यांना शिव्या घालू लागले आहेत. पण, त्याने काहीही फरक पडत नाही. राजकारणात पाठीत खंजीर खुपसणे हा शब्द उच्चारताच पूर्वी एक चेहरा समोर यायचा. आता त्या जागी दुसरा येऊ लागला आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर टीका केली. मोर्शी येथे बुधवारी आयोजित भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे, खासदार रामदास तडस, आमदार प्रताप अडसड, भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी आदी उपस्थित होते.
(हेही वाचा : मंदिरासाठी बोंबाबोंब म्हणजे ‘दुखणे पोटाला आणि प्लॅस्टर पायाला’!)
काय म्हणाले शिवसेना नेते अरविंद सावंत?
यानंतर मात्र चंद्रकांत पाटील यांच्या या टीकेला शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिले. चंद्रकांत पाटील काय बोलतात हे त्यांनाही कळत नाही. त्यांचे मानसिक संतुलन ढासळलेले आहेत. शिवसेना पाठीत खंजीर खुपसणारी नाही, तर छातीवर वार करणारे आहोत, अशा शब्दांत सावंत यांनी पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. पाठीत खंजीर खुपसणारी शिवसेनेची औलाद नाही, असे शिवसेनेचे नेते, खासदार विनायक राऊत हेही म्हणाले.
Join Our WhatsApp Community