विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी मंत्रिमंडळाने राज्यपालांना दिली. त्या यादीत कुणी गुंड, अथवा अतिरेकी नाहीत. ते सर्व जण राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रात कार्य करणारे आहेत. म्हणून या यादीवर यादीवर राज्यपालांनी स्वाक्षरी करण्यासाठी ८ महिने लावण्याची गरज नाही, असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले.
राज्यपालांवर राजकीय दबाव!
बुधवारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यपालांना भेटले. त्यांचे हसरे फोटो पाहायला मिळाले. तसेच हे सर्व मंत्री हसत हसत, सकारात्मक ऊर्जा घेऊन राजभवनातून बाहेर पडले. यावरून १२ आमदारांच्या यादीबाबत राज्यपाल सकारात्मक आहेत, असे दिसते, ते लवकरच यादीला मंजुरी देतील, या प्रकरणी न्यायालयाला मतप्रदर्शन करण्याची गरज नव्हती, असे राऊत म्हणाले. महाराष्ट्रात राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात चांगलेच संबंध होते, असा इतिहास आहे. ठाकरे सरकार हे घटनेला अनुसरून काम करते, हे राज्यपालांनाही माहीत आहे. आता बुधवारच्या भेटीतून काय निर्णय लागेल, हे राज्यपालांनी त्यांच्या कृतीतून दाखवावे, असेही संजय राऊत म्हणाले. राज्यपाल यांच्यावर राजकीय दबाब असल्याशिवाय ते स्वाक्षरीसाठी इतका विलंब करणार नाहीत, त्यामुळे राज्यपालांनीच त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे, याचा खुलासा करावा. राज्यपाल हे ज्येष्ठ नेते आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.
पाठीत खंजीर खुपसण्याची सेनेची संस्कृती नाही!
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सेनेवर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला, त्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करावे. राज्यात यापेक्षा अनेक महत्वाचे विषय आहे. मुख्यमंत्री उत्तम काम करत आहेत, ते देशात पहिल्या पाचात आले आहे, याचे विरोधकांना दुःख आहे. शिवसेनेचा इतिहास सर्वांना माहित आहे. पाठीत खंजीर खुपसण्याचे उद्योग शिवसेनेने कधी केले नाहीत. बंद दाराआड काय झाले होते, त्यानंतर काय घडले, हे सर्वांना माहित आहे, असे सांगत संजय राऊत यांनी युती तुटण्यामागील कारणांची आठवण करून दिली.
Join Our WhatsApp Community