एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर हा निधी तातडीने वितरित करण्यात आला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पगारापासून वंचित असलेल्या एसटी कर्मचा-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अजित पवारांनी दिले निर्देश
चालू आर्थिक वर्षासाठी १ हजार ४५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदींपैकी ८३८ कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरित केला असून, उर्वरित ६१२ कोटींपैकी ५०० कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानंतर तातडीने हा निधी वितरित करण्यात आला आहे.
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी समिती
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून, महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community