भारताचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्योत्सव देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सरकारी संस्थांच्या वतीने विवध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पुण्यातील येरवडा जेलमधून सायकल रॅलीच्या माध्यमातून असाच एक कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल(सीआयएसएफ)च्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे. ही सायकल यात्रा स्वातंत्र्य युद्धासाठी आपलं आयुष्य वेचणा-या वीरांच्या जन्मस्थळांतून मार्गक्रमण करणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थळ असलेल्या नाशिक येथून सुद्धा ही यात्रा जाणार आहे. परंतु या यात्रेच्या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल द्वारे आयोजित या सायकल यात्रेची पुण्यातील येरवडा तुरुंगातून सुरुवात होणार असून, ती दिल्लीतील राजपथापर्यंत जाणार आहे. ही सर्वात लांब सायकल यात्रा 4 सप्टेंबर रोजी रवाना होणार आहे. पुणे ते दिल्ली असा 1 हजार 703 किमी. चा हा सायकल प्रवास 27 दिवसांत पूर्ण होणार आहे. स्वातंत्र्य समरात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या ठिकाणांहून ही यात्रा मार्गक्रमण करणार आहे.
(हेही वाचाः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : भाजपाला गरजेपुरते आठवतात का वीर सावरकर?)
अशी होणार यात्रा
या यात्रेचा उद्घाटन समारंभ येरवडा जेल आणि आगा खान पॅलेस अशा दोन ठिकाणी होणार आहे. 4 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता ही यात्रा आगा खान पॅलेस येथे पोहोचेल. त्यानंतर ही यात्रा पुण्यातील राजगुरु नगर येथे जाईल. राजगुरु नगर, सावंतवाडी, संगमनेर, नाशिक येथील भारतीय सुरक्षा प्रेस, चांदवड, अरवी शहर आणि शिरपूर फाटा येथून जाणार आहे.
स्वातंत्र्यवीरांचा पडला विसर
या रॅलीत समाविष्ट असलेल्या ऐतिहासिक ठिकाणांपैकी राजगुरू नगर(हुतात्मा राजगुरुंचे जन्मस्थान), मध्य प्रदेशातील भावरा(हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांचे जन्मस्थान) आणि शिवपुरी(तात्या टोपे यांचे बलिदान स्थळ) या ठिकाणांचा समावेश आहे. असे असताना भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य पणाला लावलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीचा आपल्या कार्यक्रमात उल्लेख करायचा सीआयएसएफला विसर पडला. सीआयएसएफकडून अमृतमहोत्सवी स्वातंत्र्योत्सवात वज्रनिश्चयी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पवित्र भूमीचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
Join Our WhatsApp Community