महापालिकेच्या दिशा-निर्देशानुसार गणेशोत्सव साजरा करण्याचे महापौरांचे आवाहन

162

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेतर्फे जे दिशा-निर्देश देण्यात आले आहे, त्याचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी गणेशोत्सव मंडळ आणि समन्वय समितीला केले आहे. डेंगू, मलेरियाची साथ लक्षात घेता प्रत्येक गणेश मंडळाच्या ठिकाणी महापालिकेने दिवसातून तीन वेळा धूर फवारणी करण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले आहे. कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर येऊन ठेपली असून मुंबईकरांनी आतापर्यंतच्या दोन्ही लाटेमध्ये चांगले सहकार्य केले आहे. त्याचपद्धतीने सहकार्य करून कोरोनाविषयक सर्व नियम पाळून आपण गणेशोत्सव साजरा करूया, असे प्रतिपादन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.

दूरदृश्य प्रणालीद्वारे महापौरांच्‍या अध्‍यक्षतेखाली बैठक पार पडली 

बृहन्मुंबई  सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, मूर्तिकार संघ व अन्य मंडळे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पोलिस प्रशासन यांच्यासह विविध प्राधिकरणांचे अधिकारी यांची संयुक्त बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे  गुरुवारी महापालिका मुख्यालय येथे महापौरांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजित करण्‍यात आली होती. याप्रसंगी बोलतांना त्यांनी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक चांगल्या सूचना केल्या आहेत. मुंबईतील गणेश मंडळाच्‍या वतीने समन्‍वय समितीने मांडलेल्‍या सूचनांचे निराकरण करणे हा मुख्‍य उद्देश बैठक आयोजित करण्‍यामागे असल्‍याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच गणेश मंडळाचा महापालिकेसोबत असलेला सुसंवाद अधिक चांगला करण्यासाठी संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी दुपारी तीन ते पाच या वेळेत विभाग कार्यालयात उपस्थित राहून गणेश मंडळांच्या परवानगीचे सर्व कामे पूर्ण करण्यास सहकार्य करावे, असे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.

(हेही वाचा : सहाय्यक आयुक्तांकडून आमदारांची पाठराखण, अभियंत्यांचे खच्चीकरण)

गणेश मंडळांनी केल्या सूचना 

श्री गणेशाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे प्रशासनाने पूर्ण भरुन घ्यावे. महापालिका प्रशासन व पोलिस प्रशासन यामध्‍ये योग्‍य तो समन्‍वय ठेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेऊन श्री गणेशमूर्तींचे आगमन व विसर्जन व्‍यवस्थित व्‍हावे म्‍हणून सर्व उपाययोजना कराव्‍यात, तसेच धोकादायक उड्डाणपुलांवरुन ये-जा होणाऱ्या श्री गणेशमूर्तींबाबत कोणत्‍याही दुर्घटना होणार नाहीत, याची विशेष खबरदारी घेण्‍याचे निर्देशही महापौरांनी या बैठकीत दिले. त्यासोबतच गणेश मंडळांनी मंडपासाठी केलेले खड्डे बुजविण्याच्या सूचनाही महापौरांनी यावेळी केली. सभागृह नेते विशाखा राऊत यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, विभाग कार्यालयात गणेश मंडळांच्या परवानग्यांसाठी नेमणूक करण्यात आलेल्या महापालिकेच्या विभाग कार्यालयातील नोडल अधिकाऱ्यांनी आपला भ्रमणध्वनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना द्यावा, जेणेकरून मंडळाच्या कार्यकर्त्यांना संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यास सोयीचे होईल, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. त्यासोबतच यावेळी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबांवकर, तोंडवळकर, बाळासाहेब कांबळे यांच्यासह इतर मान्यवरांनीही समयोचित मार्गदर्शन करताना काही सूचना केल्या. प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. तसेच उप आयुक्‍त (परिमंडळ – २) व गणेशोत्‍सवाचे समन्‍वयक हर्षद काळे यांनी एकंदरीत महापालिकेने केलेल्‍या कामांचा तसेच तयारीचा एकंदरित आढावा घेऊन सर्व ती उपाययोजना करण्‍यात येतील, असे सांगितले.

बैठकीला हे उपस्थित होते!

या बैठकीस उप महापौर अँड. सुहास वाडकर, सभागृह नेते विशाखा राऊत, सुधार समितीचे अध्‍यक्ष सदानंद परब, शिक्षण समितीच्‍या अध्‍यक्षा संध्या दोशी, महापालिका नगरसेवक / नगरसेविका तसेच अतिरिक्‍त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) सुरेश काकाणी,  बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबांवकर,  सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती (उपनगरे) सचिव डॉ. विनोद घोसाळकर, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे प्रमुख कार्यवाहक गिरीश वालावलकर, बृहन्‍मुंबई गणेश मुर्तिकार संघाचे अध्‍यक्ष गजानन तोंडवळकर, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, उप आयुक्त (परिमंडळ – २) व श्री गणेशोत्सवाचे समन्वयक हर्षद काळे, सर्व परिमंडळीय उप आयुक्त व संबंधित सहाय्यक आयुक्त, खाते प्रमुख व पालिका अधिकारी तसेच मुंबई पोलिस, वाहतूक पोलिसचे अधिकारी, विविध संस्‍थांचे पदाधिकारी दूरदृश्य  प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.