अहमदनगरमधील मॉकड्रिलमागील नेमके रहस्य काय? 

169

एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील शेंडी गावात सर्व गावाला आपात्कालीन परिस्थितीत एकाच वेळी सूचना देणे, निरोप देणे, सावध करणे किंवा मदतीला बोलावण्यासाठी जगातील सर्वोत्तम आपत्कालीन संपर्क यंत्रणा असणाऱ्या ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक अहमदनगर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने घेण्यात आले.

१० मिनिटांतच हजर झाले पोलिस!

बुधवार, १ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास शेंडी गावातील इंडियन ओव्हरसीज बँकेत नियमित आर्थिक व्यवहार सुरु असतांना तीन अज्ञात हत्यारबंद व्यक्ती बँकेत दरोड्याच्या उद्देशाने प्रवेश करतात. बँके शेजारील दुकानदार  यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर वर (18002703600) कॉल करून सर्व गावाला सावध केले. त्यांचा कॉल ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून तत्काळ शेंडी गावाच्या हद्दीतील १५०० नागरिक, एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनचे सर्व ५५ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनाही घटनेची माहिती मिळाली, दरोडेखोरांचे वर्णन कळाले. पोलिसांनीही ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले व १० मिनिटांत गावात पोलिस हजर झाले. प्रत्येकाने आपापल्या परीने सावधानता घेत बँकेचा घेराव केला. पोलिसांनी दरोडेखोरांना बँकेतून बाहेर येण्याचे वारंवार आवाहन केले. बँकेतून दरोडेखोर बाहेर येताच उपस्थित नागरिक व पोलिसांनी या चोरांना जेरबंद केले व सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर समजले की हे मॉकड्रिल होते.

(हेही वाचा : जागतिक पातळीवरून हिंदुत्वाचे उच्चाटन करण्यासाठी ‘हे’ रचले आहे षडयंत्र!)

पोलिसांनी अशी तयार केली यंत्रणा!

पोलिसांनी सर्व नागरिकांना सविस्तर माहितीसाठी गावात एकत्रित करून मार्गदर्शन केले. नागरिकांना ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी होण्याचे आवाहन केले. ग्राम सुरक्षा यंत्रणा ही संकल्पना जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील  यांचे मार्गदर्शनात अहमदनगर जिल्ह्यातील सर्व गावांत कार्यान्वित करण्याचे काम सुरु आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेत सर्वच गावांनी कायम स्वरूपी सहभागी राहण्याचे मान्य केले. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक  डी.के. गोर्डे यांनी प्रात्यक्षिकानंतर सर्व ग्रामस्थांना यंत्रणेच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात गावांत, वस्तीवर घडणाऱ्या चोरी, दरोड्याच्या घटनांत स्थानिक पोलिस कर्मचारी, अधिकारी यांना तत्काळ सावध करणे, सूचना देणे असे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पडले. ही यंत्रणा नागरिक, पोलिस यांच्यात संपर्काचे प्रभावी माध्यम आहे. प्रात्यक्षिक यशस्वी होण्यासाठी नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या मार्गदर्शनात एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि युवराज आठरे व सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.