कोविड काळात बंद केलेली मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद करत भाजप आणि मनसेकडून आंदोलने केली जात असताना देव फक्त मंदिरात न राहता रुग्णालयांमध्येही वसतो, असे सांगत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांना अप्रत्यक्ष टोला लगवला. व्यथा घेवून आपण मंदिरात जातो, तसे रुग्ण व्याधी घेवून रुग्णालयात येतात. औषधोपचार घेतल्यानंतर, बरे होवून हसत खेळत रुग्ण घरी परततात. त्यासाठी डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय असे सर्वजण देवाच्या रुपातच सेवा करतात,असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी नायर रुग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यात बोलतांना काढले.
मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयाचा शतकपूर्ती सोहळा शनिवारी, ४ सप्टेंबर २०२१ रोजी मुंबई सेंट्रल स्थित बाई य.ल. नायर रुग्णालयाच्या सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. याप्रसंगी बोलतांना त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या बाई य. ल. नायर रुग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री या नात्याने उपस्थित राहता येणे, हा माझ्या आयुष्यातील भाग्याचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. या रुग्णालयाच्या शतकपूर्ती निमित्ताने या रुग्णालयास महानगरपालिका व राज्य शासन यांच्याकडून संयुक्तरित्या एकूण १०० कोटी रुपयांचा विशेष निधी देण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.
(हेही वाचा : प्रमोद भगतचा पॅरालिम्पिकमध्ये ‘सुवर्ण’ प्रताप!)
नायर रुग्णालय काळानुरुप बदल स्वीकारुन आधुनिक होतेय!
नायर रुग्णालयाचा शंभर वर्षांचा प्रवास थक्क करणारा आहे. अनेकदा मोठ्या कामांची सुरुवात होते, पण त्यात सातत्य राहत नाही. नायर रुग्णालय तर स्वातंत्र्याच्याही २५ वर्ष आधी सुरु झाले. ही संस्था आजही सातत्याने पुढे जाते आहे, तरुण होते आहे. काळानुरुप बदल स्वीकारुन आधुनिक होते आहे. या रुग्णालयाची इमारत ही निर्जीव नाही. त्यामध्ये अनेकांनी जीव ओतलेला आहे. स्वतः जीव ओतून रुग्णांना जीवनदान देण्याचे काम अहोरात्र या रुग्णालयाने, यातील वैद्यकीय मंडळींनी केले आहे. निव्वळ शतायुषी होवून जर्जर होवून उपयोग नाही, हे या रुग्णालयाने दाखवून दिले आहे. जिद्द असले तर काय होवू शकते, याचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजे नायर रुग्णालय होय, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमूद केले.
कोरोनासंबंधीची सांख्यिकी माहिती संकलित करावी!
कोविड काळामध्ये कौतुक होत असलेल्या मुंबई मॉडेलचे खरे मानकरी सर्व डॉक्टर्स व त्यांचे सहकारी आहेत. खंबीरपणे आरोग्य व्यवस्था उभी राहिली म्हणून कोविड संसर्गावर नियंत्रण मिळवता आले. शंभर वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूची साथ आली होती, त्यावेळी मास्क घालणे हाच प्राथमिक संरक्षक उपाय होता. तोच उपाय आजही कोविड काळामध्ये आहे. यापूर्वीही विषाणू आले होते, कदाचित नंतरही येतील. अशा साथरोगांच्या कालावधीमध्ये काय उपाययोजना केल्या पाहिजेत, त्याची माहिती, सांख्यिकी संकलित करुन ठेवली पाहिजे. दोनशे वर्षांनंतरही ती माहिती उपलब्ध असायला हवी, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
महानगरपालिकेची सर्व रुग्णालये म्हणजे मुंबईकरांची हृदये! – महापौर
या शतकपूर्ती सोहळ्यामध्ये विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये वैद्यकीय कौशल्य प्रयोगशाळा, संगणकाच्या मदतीने प्रशिक्षण प्रयोगशाळा आणि रोगप्रतिकारशक्तीशास्त्र संशोधन केंद्र यांचा समावेश आहे. रुग्णालयाच्या शतकपूर्ती निमित्त भारतीय टपाल खात्याकडून प्रकाशित विशेष टपाल आवरण (स्पेशल कवर) चे प्रकाशनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. नायर रुग्णालयाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीची तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णालयाने केलेल्या घोडदौडीची ठळक वैशिष्ट्ये सांगणारा माहितीपट देखील यानिमित्ताने प्रदर्शित करण्यात आला. पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अन्य एका वैद्यकीय कौशल्य प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख यांनी ‘ग्लिम्प्सेस ऑफ नायर पब्लिकेशन’ या वैद्यकीय शोधनिबंधांच्या संग्रहाचे प्रकाशन केले. महानगरपालिकेची सर्व रुग्णालये म्हणजे मुंबईकरांची हृदये असल्याचे सांगत महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड काळामध्ये सर्वात आधी ७०० ते १००० हजार रुग्णशय्या क्षमता तयार केलेले नायर रुग्णालय हे पहिले होते, असे सांगितले. कोविड काळामध्ये गर्भवती महिलांची प्रसुति सुखरुप करताना या रुग्णालयाने केलेली कामगिरी जगात वाखाणली गेली आहे. कोविड काळात खचून न जाता जीवाची पर्वा न करता महानगरपालिकेने काम केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा : हाजीअलीत कचऱ्यापासून होणार वीज निर्मिती)
Join Our WhatsApp Community