ज्यांना इतिहास घडवता येत नाही ते इतिहास पुसतात, रोखठोकमधून राऊतांची केंद्रावर टीका

122

‘इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ (ICHR) या संस्थेने ‘आजादी का अमृत महोत्सव’च्या पोस्टरवरुन पंडित नेहरुंचे चित्र वगळल्यानंतर आता त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेनेने देखील यात उडी घेतली असून, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोकमधून केंद्र सरकारवर टीका केली आहे. इतिहास पुसणे हे शौर्य नाही, ज्यांना इतिहास घडवता येत नाही असे लोक इतिहासाचे संदर्भ पुसण्यातच धन्यता मानतात, ही जगभराची ‘रीत’ आहे, असा टोला संजय राऊत यांनी हाणला आहे. एवढेच नाही तर राहुल गांधी, प्रियंका, सोनियांशी मोदी सरकार, भाजपचे भांडण असू शकेल, पण पंडित नेहरुंशी वैर का? असा सवाल देखील रोखठोकमधून विचारण्यात आला आहे.

काय आहे रोखठोक मत?

ज्यांचा इतिहास घडवण्यात सहभाग नव्हता व देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून जे दूर राहिले अशांकडून स्वातंत्र्य लढ्याचे एक नायक पंडित नेहरुंनाच स्वातंत्र्य लढ्यातून दूर केले जात आहे, हे बरे नाही. पंडित नेहरू व त्यांच्या काँग्रेस पक्षाविषयी मतभेद असू शकतात. नेहरुंच्या राष्ट्रीय, राजकीय, आंतरराष्ट्रीय भूमिका कदाचित कुणाला मान्य नसतील, पण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील नेहरुंचे स्थान राजकीय द्वेषापायी पुसून टाकणे हा स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक सैनिकाचा अपमान असल्याचे रोखठोकमध्ये म्हटले आहे.

(हेही वाचाः दादा-राऊतांमध्ये कलगीतुरा, चंद्रकांत पाटलांच्या टीकेला राऊतांनी दिले असे उत्तर)

कोत्या मनाचे सरकार

भारतीय स्वातंत्र्याचे सध्या अमृतमहोत्सवी वर्ष सुरू आहे. भारतात इतिहास संशोधनावर काम करणाऱ्या ‘इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ (ICHR) या संस्थेने ‘आजादी का अमृत महोत्सव’च्या पोस्टरवरुन पंडित नेहरुंचे चित्र वगळले. या पोस्टरवर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, मदन मोहन मालवीय आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची छायाचित्रे ठळकपणे आहेत. पण पंडित जवाहरलाल नेहरू व मौलाना अबुल कलाम आझाद यांना वगळण्यात आले. नेहरु, आझादांना वगळून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. पण नेहरुंना खासकरुन वगळून विद्यमान सरकारने आपल्या कोत्या मनाचे दर्शन घडविल्याची टीका देखील करण्यात आली आहे.

काय साध्य करायचे आहे?

स्वातंत्र्यलढा हा आपला इतिहास आहे. इतिहास म्हणजे मनुष्याच्या प्रगतीची व दोषांची नोंद असते. इतिहास म्हणजे त्या-त्या कालखंडातील त्या-त्या लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय व आर्थिक विचारांचे, आशा- आकांक्षांचे, घडामोडींचे आणि स्थितीचे प्रतिबिंब असते. त्या घटनांचे, घडामोडींचे, विचारप्रवाहांचे ते एक प्रकारचे विवेचन असते. थोडक्यात, इतिहास हे मानवी समाजाचे एक अखंड, अभंग आणि अविभाज्य छायाचित्रंच असते. त्या छायाचित्रांतून पंडित नेहरुंना वगळून कोणाला काय साध्य करायचे आहे, असा सवाल रोखठोकमधून विचारण्यात आला आहे.

(हेही वाचाः आता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात मिळणार तलवारबाजीचे प्रशिक्षण)

द्वेष करावा असे काय घडले?

इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात काही विशेष व्यक्ती जन्माला येतात आणि आपल्या विचारांनी जगाला एका नवीन विचारप्रवाहात ओढून नेतात. नेहरू हेदेखील असेच व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या विचारांतून शांततेचा संदेश देताना ‘जगा व जगू द्या’ हे तत्त्व सर्वांनी स्वीकारावे असा आग्रह धरला. श्रीमंत व माजोरड्या राष्ट्रांच्या तुलनेत गरीब, मागास व दुर्बल राष्ट्रांचा एक गट तयार केला, त्यांना एकतेच्या भावनेने बांधले. नेहरुंचा द्वेष करावा असे त्यांच्याकडून काय घडले? उलट नेहरूंनी निर्माण केलेल्या संस्था, सार्वजनिक उपक्रम विकून देशाचा आर्थिक गाडा चालवला जात असल्याची टीका देखील राऊतांनी केली आहे. विद्यमान मोदी सरकारचे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधींशी राजकीय भांडण असायला हरकत नाही. सरकारने राजीव गांधी यांच्या नावाने दिल्या जाणाऱया ‘खेलरत्न’ पुरस्काराचे नावही बदलून आपला द्वेष जगजाहीर केला, पण पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांचे स्वातंत्र्य लढय़ातील आणि देशाच्या जडणघडणीतील योगदान हा अमर इतिहास आहे. तो नष्ट करून काय साध्य होणार? असा सवाल देखील देखील उपस्थित करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.