मागील शनिवारी ४ सप्टेंबर रोजी केवळ दुसऱ्या डोसच्या व्यक्तींचे लसीकरण करण्याची मोहीम रावबल्यानंतर आता पुन्हा एकदा महापालिकेने दुसऱ्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी, ९ सप्टेंबर रोजी केवळ दुसरा डोस असलेल्यांसाठीच लसीकरण केले जाणार आहे. यादिवशी कोणत्याही व्यक्तीला पहिला डोस दिला जाणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. दरम्यान लसीकरणामध्ये मुंबई कोट्यधीश बनल्याची घोषणा मागील शनिवारी महापालिकेने केली असली तरी प्रत्यक्षात मंगळवारी लसीकरणाचा कोटींचा आकडा पार करण्यात आला आहे. मंगळवारी एकूण १ कोटी ४१ हजार ५७९ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
एकूण ४५० कोविड-१९ लसीकरण केंद्रे कार्यान्वित
लसीकरणासाठी मुंबई महानगरात महानगरपालिका व शासकीय रुग्णालये मिळून ३२० तर खासगी रुग्णालयात १३० अशी एकूण ४५० कोविड-१९ लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. ७ सप्टेंबर २०२१ पर्यंत एकूण ७१ लाख ६१ हजार ४२७ लाभार्थ्यांना (८० टक्के) लसीची पहिली मात्रा तर २८ लाख ८० हजार १५२ एवढ्या लाभार्थ्यांना (३० टक्के) दुसरी मात्रा देण्यात आली आहे. शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ आदेशांमधील सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार, कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेऊन पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी उपनगरीय रेल्वेप्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच काही खासगी आस्थापना देखील पूर्ण लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याची अनुमती देत आहेत.
(हेही वाचा : मुलांच्या सुट्टीबाबत मनसेची शिक्षणाधिकाऱ्यांकडे काय आहे मागणी?)
पुन्हा एकदा विशेष सत्र आयोजित करण्यात आले!
कोविड-१९ विषाणू प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने कोविड लसीचे दोन्ही डोस घेवून लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रावर, गुरुवार ९ सप्टेंबर २०२१ रोजी कोविड-१९ लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे या दिवशी कोविड लसीचा पहिला डोस कोणालाही दिला जाणार नाही. यानुषंगाने, दुसरा डोस देण्यात येणाऱ्या नागरिकांसाठी लस मात्रांच्या उपलब्धतेनुसार विशेष लसीकरण सत्र सर्वप्रथम ४ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आले हेाते. या लसीकरण सत्रास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्यादिवशी १ लाख ७९ हजार ९३८ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला होता. हा प्रतिसाद लक्षात घेता तसेच नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याची प्राथमिकता पाहता, मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रावर, गुरुवार, ९ सप्टेंबर २०२१ रोजी कोविड-१९ लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी पुन्हा एकदा विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे या दिवशी कोविड लसीचा पहिला डोस कोणालाही दिला जाणार नाही. सबब, दुसरा डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांनी या सत्राचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे
Join Our WhatsApp Community