औरंगजेबाने आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अटक केल्याचे वृत्त धडकताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात व चिंतेत बुडाला होता, पण महाराजांच्या अटकेनेही आनंद मानून, गोडधोड वाटणारा एक वर्ग तेव्हाही महाराष्ट्रात होताच. त्याच प्रवृत्तीचे लोक बेळगाव महापालिका निवडणुकीतील मराठी पराभवाचा आनंद साजरा करीत आहेत. मराठीजनांचे शाप व हुतात्म्यांचे तळतळाट त्यांना लागतील. सीमा बांधवांचा लढा सुरूच राहील, मराठी एकजूट पुन्हा उसळून समोर येईल! बेळगावच्या पराभवातून एक धडा घ्यावाच लागेल. आपले शत्रू आणि वैरी आपल्याच घरात आहेत. एकीची वज्रमूठ सुटली की गद्दारांचे फावते!, अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाच्या अग्रलेखात भाजपावर टीका करण्यात आली.
‘ते’ कृत्य दळभद्रीच!
मराठी माणूसच मराठी माणसाचा सगळय़ात मोठा शत्रू आहे काय? असा प्रश्न बेळगाव महापालिका निकालानंतर निर्माण झाला आहे. मराठी एकजूट व मऱहाटी लढ्याचा बेळगावात दारुण पराभव झाल्याचा धक्का सगळय़ांनाच बसला आहे, पण बेळगावात मराठी माणसांचा पराभव घडताच महाराष्ट्रातील मऱहाटी भाजप पुढाऱयांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. हे दुःख टोचणारे आहे. त्यांना या पराभवाने जणू हर्षवायूच झाला. मराठी माणूस संयुक्त महाराष्ट्र लढय़ाच्या कर्मभूमीत पराभूत झाला म्हणून महाराष्ट्रात फटाके वाजवले गेले, हे जास्त वेदनादायक आहे. क्रिकेटच्या सामन्यात पाकिस्तान जिंकताच भेंडीबाजारातील काही भागात पूर्वी फटाके फुटत होते. तसलेच दळभद्री कृत्य बेळगावच्या निकालाने घडले आहे. संपूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्राचे लक्ष बेळगावच्या निवडणुकीकडे लागले होते. गेली किमान 40 वर्षे तरी बेळगाव महानगरपालिकेच्या मराठी एकजुटीचा म्हणजे छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा फडकत होता. महापालिकेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे बहुमत येतच असे. महापौर व उपमहापौर निवडून येत होते. बेळगावात ‘जय हिंद’बरोबरच ‘जय महाराष्ट्र’चा गजर घुमत होता, असे शिवसेनेने म्हटले.
बेळगावच्या पराभवाने मराठी जनता अस्वस्थ!
कर्नाटक सरकारने मराठी शाळा, मराठी ग्रंथालये, मराठी सांस्कृतिक चळवळी बंद पाडल्या. शिवरायांचे पुतळे बुलडोझर लावून दूर केले. गावांचे मराठी भाषेतील नामफलक तोडले व या अन्यायाविरुद्ध २० लाख सीमा बांधव लढतच आहेत. एक निवडणूक हरले म्हणून लढा संपत नाही. जेथे भाषा, संस्कृती व अस्मितेचा प्रश्न येतो तेथे मराठी माणूस वाघाच्या काळजाने लढतच असतो. शिवसेनेने बेळगावच्या लढय़ासाठी ६९ हुतात्म्यांची आहुती दिलीच आहे. शिवसेनाप्रमुखांनी या कार्यासाठी तीन महिन्यांचा तुरुंगवासही भोगला, म्हणूनच बेळगावातील मराठी एकजुटीच्या पराभवाने शिवसेना, महाराष्ट्राची जनता अस्वस्थ झाली आहे.
Join Our WhatsApp Community