खडसेंकडूनच भूखंड घोटाळा! काय म्हटले ईडीने न्यायालयात? 

एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदावर असताना पदाचा गैरवापर करत स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांचा फायदा करुन दिला, असे ईडीने म्हटले.

149

भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच ईडीचा ससेमिरा मागे लागलेल्या एकनाथ खडसे यांनीच भोसरी भूखंड घोटाळा केला आहे, असे ईडीने न्यायालयाला सांगितले आहे. तसे स्पष्ट निष्कर्ष ईडीने नोंदवले आहेत. त्यामुळे आता खडसेंच्या भोवती ईडीचा  फास आणखी आवळला जाणार आहे, अशी चिन्हे आहेत.

गिरीश चौधरींना जामीन नाकारला!

एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदावर असताना पदाचा गैरवापर करत स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांचा फायदा करुन दिला, त्यातूनच त्यांनी भोसरी येथील एमआयडीसीचा भूखंड अत्यंत कवडीमोल दरात विकत घेतला आहे, असे ईडीने म्हटले. त्यावर एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अशा परिस्थितीत जामीन देता येणार नाही, अन्यथा समाजात वाईट संदेश जाईल, असे न्यायालयाने म्हटले.

(हेही वाचा : किरीट सोमय्या पुण्यात! अजित पवार निशाण्यावर!)

गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते

न्यायालयाने म्हटले की, खडसे हे महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाचा भाग आहेत, मात्र हा गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते. त्यावेळीही ते सत्ताधारी पक्षाचा भाग होते, या गोष्टीकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. खडसेंना भूखंड घोटाळ्यात घेऊन ईडीने आता खडसेंच्या भोवतीचा फास आवळला आहे. त्यामुळे जावई गिरीश चौधरी याची कोठडी वाढणार आहे.

काय आहे भोसरी जमीन घोटाळा?

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसीचा भूखंड खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी १२ एप्रिल, २०१६ रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचे समोर आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.