ठाणे महापालिकेत शिवसेनेचे वर्चस्व आहे, त्यामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला जमीन देण्यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेने मंजूर केला असेल, तर तो शिवसेनेचा अधिकार आहे. या बुलेट ट्रेनला शिवसेनेचा विरोध नव्हताच, त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला होता. कारण मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा फायदा अहमदाबादला होणार आहे, आमचे मत मुंबई-दिल्ली मार्गावर बुलेट ट्रेन सुरु करावी, अशी होती, त्यामुळे मुंबईला अधिक फायदा होणार आहे. महाविकास आघाडीने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला हिरवा कंदील दिला नाही, तशी चर्चाही झाली नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्यामुळे या प्रकरणी महाविकास आघाडीतील आणखी नवीन मतभेदाचे प्रकरण समोर आले आहे.
चर्चेतून सुवर्णमध्य काढावा!
सध्या अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे काम अहमदाबादच्या दिशेने वेगात सुरु आहे. त्यामुळे आता या बाजूनेही निर्णय घ्यावा लागणारच आहे, त्यावर राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यंमत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल. कोणत्याही प्रक्रल्पाला आधी विरोध होतच असतो, समृद्धी महामार्गालाही विरोध झाला होता, पण हळूहळू तो विरोध मावळतो. कारण अनेकांच्या जमिनी यात जात असतात. तसेच बुलेट ट्रेनसाठीही जमीन जाणार आहे. त्यामुळे यावर चर्चा करून त्यातून सुवर्णमध्य काढणे अपेक्षित आहे, असेही अजित पवार म्हणाले.
(हेही वाचा : किरीट सोमय्या पुण्यात! अजित पवार निशाण्यावर!)
‘बुलेट ट्रेनच्या बदल्यात आरे’, असे काही नाही!
देशाचा विकास करण्यासाठी बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प हाती घेतले जातात. देशातील मुंबई, दिल्ली, बंगळुरु, कोलकत्ता, अहमदाबाद, चेन्नई ही सर्व शहरे एकमेकांना बुलेट ट्रेनने जोडण्याचा प्रस्ताव आला होता. त्यादृष्टीने सर्वे सुरु आहे. अशी कामे होतच असतात, राज्य सरकारनेही मुंबई – सिंधुदुर्ग कोस्टल हायवेला परवानगी दिली आहे. आम्हीही वेगवान वाहतुकीसाठी प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यामुळे ‘तुम्ही बुलेट ट्रेनला पाठिंबा द्या आम्ही आरेचा मुद्दा सोडू’, असे काही बोली झाली नाही, असेही अजित पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community