शिवसेना आणि नारायण राणे वाद सर्वश्रुत आहे. नुकतीच नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात जन आशीर्वाद यात्रा काढली. या यात्रेदरम्यान हा वाद संपूर्ण महाराष्ट्राने पुन्हा एकदा अनुभवला होता. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे हा राजकीय वाद जास्तच चिघळला होता. मात्र, आता पुन्हा एकदा ऐन गणपतीमध्ये पुणे पोलिसांकडून नारायण राणेंच्या पत्नी आणि मुलाविरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आल्याने, पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
पुणे पोलिसांकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणेंविरुद्ध लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आली आहे. डीएचएफएल कडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे न्यायालयाच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. डीएचएफएलकडून आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लि. आणि नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लि. या कंपनीने ४० कोटींचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड न केल्याने लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. डीएचएचएफएल कंपनीने केलेल्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
(हेही वाचाः घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता होताच भुजबळांची ‘शेरो शायरी’)
राणे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ?
काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केलं होतं. त्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेचं नाट्य दिवसभर रंगलं होतं. अखेर रात्री उशिरा त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर आता राणे कुटुंबियांची अडचणीत वाढ करणारं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी राणे कुटुंबीय नेमकी काय प्रतिक्रिया देतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Join Our WhatsApp Community