‘जमीनदार’ काँग्रेसच्या ‘संपत्ती’वरून आता आरोप-प्रत्यारोप!

149

एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सध्याच्या काँग्रेसची ‘रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार’, अशी केल्यानंतर राज्यात खळबळ माजली आहे. ज्या काँग्रेसच्या आधारे पवारांचा महाविकास आघाडीचा प्रयोग सफल झाला, त्याच काँग्रेसवर पवार अधूनमधून तोंडसूख घेत असतात. त्याप्रमाणे आताही पवारांनी थेट काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचीच हजेरी घेतली. त्यामुळे आता पवारांच्या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

काय म्हणाले होते शरद पवार? 

सध्याच्या काँग्रेसची अवस्था ही रया गेलेल्या मोठ्या हवेलीच्या जमीनदारासारखी झाली आहे. उत्तर प्रदेशात अशा हवेलीचा जमीनदार रोज सकाळी उठतो तेव्हा आजूबाजूचे हिरवं गार शिवार पाहून म्हणतो हे सगळं माझं होते, आता नाही, अशीच काहीशी अवस्था सध्याच्या काँग्रेसची झाली आहे, उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. लँड सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. पण त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनीची आता १५-२० एकरवर आली. सकाळी जमीनदार उठतो आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही, असे पवार म्हणाले.

काय म्हणाले नाना पटोले? 

त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तिखट शब्दांत शरद पवारांना सुनावले,  शब्दांत एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाचे वर्णन केले. शरद पवार साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी काही फार बोलायचे नाही असेच ठरले आहे. पण त्यांनी पक्षावर प्रतिक्रिया दिली, असे म्हणत पटोले यांनी आपले मत व्यक्त केले. काँग्रेसने कधी जमीनदारी केली नाही. हा काही जमीनदारांचा पक्ष नाही. उलट काँग्रेसने अनेक लोकांना जमीन राखायला दिली, त्यांना ताकद दिली पण त्यांनीच काँग्रेसचा घात केला. राखणदारांनीच जमीन चोरली. डाका घातला. त्यामुळे ही परिस्थिती झाली असेल, असे पवार साहेबांना म्हणायचे असेल तर दुसऱ्या पक्षाबद्दल प्रतिक्रिया देऊ नयेत, असे आम्ही लहान माणसे मोठ्या व्यक्तींना सांगू इच्छितो. प्रत्येकाचे स्वत:चे मत असते, पण २०२४ नंतर देशात काँग्रेसचा पंतप्रधान बनेल हे निश्चित आहे. मोदींचे सरकार ज्या पद्धतीनं देश विकायला निघाले, त्यामुळे लोकांमध्ये तीव्र रोष आहे. भाजपला पर्याय काँग्रेसच आहे हे सामान्य जनतेला कळून चुकलंय. तरीही अशा प्रतिक्रिया देऊन काँग्रेसचे नेतृत्व खच्ची करण्याचा प्रयत्न होतोय, तो आता खपवून घेतला जाणार नाही’ असा अप्रत्यक्ष इशाराही पटोले यांनी दिला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 

वाकयुद्धात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेत म्हणाले, काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगत आहे. वऱ्हाडात असे म्हणतात की मालगुजरी तर गेली, पण उरलेल्या मालावर आता गुजराण सुरू आहे. तशा प्रकारचे वक्तव्य पवार साहेबांनी केले आहे. ते काँग्रेसवर चपखलपणे लागू होत आहे, असा टोमणा देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.