दोनच दिवसांपूर्वी राज्याची सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ५० हजारापेक्षा अधिक झाल्यामुळे चिंता वाढली होती. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर वाढलेली कोरोना रुग्ण संख्या राज्याची झोप उडवणारी होती. मात्र त्यानंतर लगेचच आता राज्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. शुक्रवारी, १० सप्टेंबर रोजी राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही, तसेच राज्यात दैनंदिन नवीन रुग्ण संख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्ण संख्याही ५० हजारांच्या खाली आली आहे.
काय आहे राज्याची आकडेवारी?
राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोनाची आकडेवारी जारी केली आहे. हे आकडेवारी खूपच दिलासादायक आहे. राज्यात नव्या कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्याही घटली. तर बऱ्या होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात शुक्रवारी एकूण सक्रिय रुग्ण संख्या ४८ हजार ८१२ होती, तर राज्यात ४ हजार १५४ नवीन रुग्ण आढळून आले, ४४ रुग्णांचा मृत्यू झाला तर ४ हजार ५२४ रुग्ण बरे झाले. राज्यात ९ सप्टेंबर रोजीच सक्रिय रुग्णांचा आकडा ५० हजार पार गेला होता, तर बरे झालेल्या रुग्णांची संख्याही कमी झाली होती.
(हेही वाचा : ‘जमीनदार’ काँग्रेसच्या ‘संपत्ती’वरून आता आरोप-प्रत्यारोप!)
या जिल्ह्यांत रुग्ण संख्या शून्य!
धुळे, हिंगोली, परभणी, अकोला, यवतमाळ, वाशिम, भंडारा, गोंदिया
मराठवाडा, विदर्भात कोरोनाची स्थिती ‘सुधारली’
ज्या जिल्ह्यांत एकही नवीन कोरोना रुग्ण आढळून आला नाही ते जिल्हे मराठवाडा आणि विदर्भातील आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरलेल्या महाराष्ट्राच्या या भागाने तिसऱ्या लाटेला आज तरी थोपवून दाखवून ‘करून दाखवले’, असे म्हणायला हरकत नाही.
Join Our WhatsApp Community