चिपी विमानतळ तब्बल २२ वर्षानंतर पूर्ण झाले आहे. मागील ६ वर्षांत सेनेने विशेष प्रयत्न केल्यामुळे विमानतळ पूर्ण झाल्याचा दावा सेनेने केल्यानंतर भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी हल्लाबोल करत श्रेय लाटू नका, सगळे प्रयत्न आपलेच असल्याचा दावा राणेंनी करत विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री नसले तरी चालतील, असे वक्तव्य केल्यामुळे सेनेने राणेंना चांगलेच सुनावले. त्यानंतर मात्र राणेंच्या भाषेत बदल झाला, आता राणेंनी मुख्यमंत्री उद्घाटनाला आले, तर त्यांचे स्वागतच करू, असे म्हटले आहे.
राणेंची माघार?
कोकणातील चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या विमानतळाच्या श्रेयावरुन राजकीय वातावरण तापल्याचे पहायला मिळत आहे. तसेच उद्घाटनाला कोण उपस्थित राहणार यावरुनही चांगलीच चर्चा रंगली आहे. उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विमानतळाचे उद्घाटन होईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी, विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आले तर आम्ही प्रोटोकॉलनुसार मान देऊ, असे सांगत वादातून माघार घेतली आहे.
अशी झालेली खडाजंगी?
काही दिवसांपूर्वी नारायण राणेंनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत उदघाटनाची बदलेली तारीख जाहीर करत सेनेने ७ ऑक्टोबर जाहीर केलेली तारीख रद्द करून ती ९ ऑक्टोबर असल्याचे सांगितले होते. तसेच उदघाटनाला केंद्रीय उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित राहणार आहेत, मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, असेही म्हणाले. त्यानंतर शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गातच पत्रकार परिषद घेऊन ‘२२ वर्षे राणेंनी विमानतळासाठी काहीच केले नाही, मागील ६ वर्षांत शिवसेनेने अथक प्रयत्न करून विमानतळ उभे केले, हे विमानतळ महाराष्ट्राच्या मालकीचे, राणेंनी श्रेय लाटू नये’, असे सुनावले. त्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही, ‘विमानतळ महाराष्ट्राच्या मालकीचे आहे, उदघाटनाची कार्यक्रमात आम्ही यजमान आहोत, केंद्रीय उड्डयनमंत्री सिंधिया आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे स्वागत आहे’, असे म्हणाले. त्यानंतर नारायण राणे यांनी वादातून माघार घेतली आहे.
Join Our WhatsApp Community