गणेश चतुर्थीनिमित्ताने ‘लालबागचा राजा’चे मुखदर्शन थेट प्रक्षेपणाद्वारे दाखवण्यासाठी जमलेल्या वृत्त वाहिन्यांच्या पत्रकारांना पोलिस निरीक्षक संजय निकम यांनी अक्षरशः अपमानास्पद बोलत हाकलून लावले. त्यावेळी त्यांनी हातच नाही तर लाथेनेही मारीन, असेही म्हणाले. तसेच पत्रकारांना धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे पत्रकारांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. पत्रकारांनी याविषयी आक्षेप घेतला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघानेही या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे.
काय घडले होते?
‘लालबागचा राजा’ या सुप्रसिद्ध श्रीगणेश मूर्तीचे थेट लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी वृत्त वाहिन्यांचे पत्रकार जमले होते. या सर्व पत्रकारांकडे अधिकृत प्रवेशाचे पास होते. चार दिवसापूर्वी सर्वांना हे पास देण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी पास दाखवून प्रवेश देण्याची विनंती केली. मात्र तेव्हा पोलिस निरीक्षक संजय निकम यांनी मात्र अरेरावी करण्यास सुरुवात केली. प्रवेश देणार नाही, इथून दोन मिनिटात बाहेर पडा, असे म्हणत संजय निकम यांनी थेट पत्रकारांशी धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पत्रकारांनी संजय निकम यांनी समजुतीने घेण्यास सांगितले, तरीही संजय निकम यांनी धक्काबुक्की चालूच ठेवली. त्यावेळी संजय निकम यांना हात लावू नका, धक्काबुक्की करु नका असे सांगितले. त्यावेळी मात्र संजय निकम म्हणाले, हात काय, पाय सुद्धा लावू शकतो, असे म्हणत पत्रकाराला काठी दाखवली.
(हेही वाचा : चिपी विमानतळ उद्घाटन : राणेंचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवरील विरोध का मावळला?)
पत्रकारांचा जबाब नोंदवला!
याप्रकरणी पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्याची दखल पोलिसांच्या वरिष्ठांनी घेतली. तसेच या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करू, असे म्हटले. तसेच पत्रकारांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. त्याचबरोबर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही या प्रकरणी संबंधित अधिकारी संजय निकम यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी टीका केली.
Join Our WhatsApp Community