निवडणुकीसंदर्भात आयोगाकडे मुंबई महापालिकेची ‘ही’ आहे मागणी

फेबुवारी २०२२ रोजी मुंबई महापालिकेची निवडणूक होणे अपेक्षित आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीबाबतचा कार्यक्रम आयोगाकडून प्राप्त होणे अपेक्षित आहे.

157

मुंबई महापालिकेची सार्वत्रिक २०२२ची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असतानाही मुंबई महापालिका प्रशासनाला अद्यापही निवडणूक आयोगाकडून कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत. सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिकेने करावयाच्या पूर्व तयारीबाबत माहिती, मार्गदर्शन तथा अभिप्राय मिळवण्यासाठी राज्य निवडणूक विभागाशी पत्रव्यवहार सुरु आहे. परंतु अद्यापही राज्य निवडणूक आयोगाकडून कोणताही पत्रव्यवहार महापालिकेला प्राप्त झालेला नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे प्रभागांची हद्द आणि आरक्षण सोडत इत्यादींबाबतही महापालिका राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे.

सार्वत्रिक निवडणुकीबाबतचा कार्यक्रम आयोगाकडून प्राप्त होणे अपेक्षित

मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ ला झाल्यानंतर या महापालिकेचा कालावधी ८ मार्च २०१७ ते ७ मार्च २०२२ पर्यंत आहे. त्यामुळे फेबुवारी २०२२ रोजी महापालिकेची निवडणूक होणे अपेक्षित आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीबाबतचा कार्यक्रम आयोगाकडून प्राप्त होणे अपेक्षित आहे. मात्र, यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप तसे संकेत प्राप्त झाले नसल्याची माहिती महापालिका प्रशासनाने स्थायी समितीला दिली आहे. महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी आरक्षण सोडतबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक असून सर्वोच्च न्यायालयाच्या इतर मार्गास प्रवर्गाच्या अर्थात ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकीय आरक्षणाबाबत दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे, अशा प्रकारचे पत्र निवडणूक आयोगाला निवडणूक विभागाची जबाबदारी असलेल्या अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी १९ जुलै २०२१ रोजी लिहिले असून अद्यापही निवडणुकीच्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने आयोगाकडून महापालिकेला माहिती, मार्गदर्शन तथा अभिप्राय प्राप्त झालेले नाहीत, असे महापालिकेने म्हटले आहे.

(हेही वाचा : धक्कादायक! ओबीसी आरक्षणाशिवायच होणार निवडणुका!)

मतदान केंद्रांची संख्या होणार ११ हजारांवर

कोविड १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांची संख्या वाढवली जाणार आहे. सन २०१७मध्ये मतदान केंद्राची संख्या ७,३०५ एवढी होती. त्यामुळे फेब्रुवारी २०२२च्या निवडणुकीत १० टक्के मतदान केंद्रांची संख्या वाढवून या एकूण केंद्रांची संख्या ८,०२९ एवढी अपेक्षित मानली जात होती. परंतु कोविडचा प्रादुर्भाव असल्यास वाढीव मतदान केंद्रांची संख्या वाढवण्याचा विचार सुरु आहे. त्यामुळे २०२२च्या निवडणुकीत ११ हजार ११ एवढी मतदान केंद्र अपेक्षित मानली जात आहेत.

मतदान यंत्रांमध्येही होणार वाढ

महापालिकेच्या २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत बीयू ८,५००, सीयू ८,१०० आणि मेमरी ८,१०० अशाप्रकारे मतदान यंत्रांचा वापर केला होता. परंतु २०२२च्या निवडणुकीत मतदान केंद्र वाढवणार असल्याने चार हजार यंत्रे वाढली जाणार आहेत. बीयू १२ हजार, सीयू १० हजार १० आणि मेमरी ११ हजार १० अशाप्रकारे मतदान यंत्राचा वापर अपेक्षित मानला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.