मागील वर्षी कोरोनाच्या सावट असल्यामुळे भाविकांनी बाप्पांचे वास्तव्य अधिक न वाढवता दीड दिवसांनी विसर्जन केले. परंतु ज्यांना मागील वर्षी दीड दिवसांमध्ये निरोप द्यावा लागला होता त्यांनी यंदा मात्र बाप्पाचे वास्तव्य वाढवले आहे. त्यामुळे बहुतांशी भाविकांच्या घरी बाप्पा आता गौरी गणपती आणि अनंत चतुर्दशीपर्यंत राहणार आहेत.
गेल्या वर्षी इतक्या मूर्तींचे विसर्जन
मागील वर्षी दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देताना ३ सप्टेंबर २०२० रोजी एकूण ६१ हजार ९३० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. तर यंदा ११ सप्टेंबर रोजी झालेल्या दीड दिवसांच्या गणेश विसर्जनामध्ये केवळ ४१ हजार २५० गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडले. त्यामुळे मागील वर्षीचा आणि यावर्षीच्या दीड दिवसांच्या गणेशमूर्तींच्या आकडेवारीवर नजर टाकली तरी सुमारे २० हजार गणेशमूर्तींचे विसर्जन झालेले नसून, हे सर्व बाप्पा आपल्या भाविकांच्या घरी आता अजून काही दिवस राहणार असल्याचे स्पष्ट होते.
(हेही वाचाः कृत्रिम तलावांकडे वळू लागले भाविक! दीड दिवसांच्या इतक्या मूर्तींचे विसर्जन)
गेल्यावर्षी काय झाले?
मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आणि कडक नियम आदींमुळे अनेकांना गावी जाता आले नाही. त्यामुळे ज्यांना गावी जाऊन गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करता आली नव्हती, त्यांनी मुंबईत बाप्पांना आपल्या घरी आणून त्यांची प्राणप्रतिष्ठा केली. यथोचित पूजाअर्चा केल्यानंतर त्यांनी जास्त दिवस बाप्पांची सेवा करण्याऐवजी दीड दिवसांमध्येच त्यांचा निरोप घेतला होता. तर जे भाविक गौरीपर्यंत किंवा अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पांची सेवा करतात, त्यांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या विघ्नहर्त्याला दीड दिवसांमध्येच निरोप दिला होता. त्यामुळेच मागील वर्षी ४० ते ४५ टक्के गणेशमूर्तींचे विसर्जन हे दीड दिवशीच झाले होते असे जाणकारांचे म्हणणे आहे.
(हेही वाचाः यंदा मुंबईतील ३८१ मंडळांकडे गणपती आलाच नाही!)
Join Our WhatsApp Community