गेले दीड वर्षभर कोविडमुळे ऑनलाईन शाळा सुरू आहेत. या ई-लर्निंगमुळे शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षण मात्र थांबलेले नाही, असे अभिमानाने सांगितले जात आहे. पण प्रत्यक्ष शाळा बंद असल्यामुळे एक धोक्याची घंटा वाजली आहे. शाळा बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाण वाढले आहे, तसेच शिक्षक आणि मुलांमध्येही पोकळी निर्माण झाली आहे. याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होत असून, त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे.
काय आहे सर्वेक्षण?
अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या वतीने प्राथमिक शाळांमधील 16 हजारहून अधिक विद्यार्थ्यांचा सर्वे करण्यात आला. त्यात भाषा आणि गणित विषयांमध्ये चिंताजनक घट दिसून आली. 92% मुलांनी कमीत-कमी भाषा क्षमता गमावली आहे, तर 82% विद्यार्थ्यांनी गणिताची कौशल्ये गमावली आहेत. यामध्ये स्वतःचे अनुभव तोंडी सांगणे, परिचित शब्द वाचणे, आकलनासह वाचन करणे, तसेच चित्रावर आधारित साधी वाक्ये लिहिणे या गोष्टी समाविष्ट होत्या. हा अभ्यास 1 हजार 137 सार्वजनिक शाळांमधील 16 हजार 67 मुलांबाबत घेण्यात आला आणि यात छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंड या पाच राज्यांमधील 44 जिल्ह्यांचा समावेश आहे.
(हेही वाचाः आता आरबीआयच्या नावानेच ऑनलाईन घोटाळा!)
शाळा उघडण्याची गरज
या अहवालानुसार, मुलांचं शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून आलं आहे. यामुळेच शाळा उघडण्यावर भर देणे खूप महत्वाचे झाले आहे. मुलांना अभ्यासात मदत करणे तसेच ब्रिज कोर्सेस, शिकवण्या, योग्य प्रमाणित अभ्यासक्रम, अभ्यासासाठी वाढीव तास यावर भर देणे आवश्यक आहे. तसेच सर्व स्तरांवर याबाबत गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. दीपा बालकृष्णन यांनी फाउंडेशनचे सीईओ अनुराग बेहेर यांची मुलाखत घेतली. त्यांच्यानुसार एक योजना आखून सर्व शाळा पुन्हा तातडीने उघडण्याची गरज आहे. मुलांना जवळच्या शाळेत पाठवणं सोयीचं असल्याने पाश्चिमात्य देशांप्रमाणे भारतातही ते राबवणं गरजेचं आहे.
लवकरच सुरू होणार शाळा
भारतातील अधिक विद्यार्थी लवकरच जवळजवळ 18 महिन्यांनंतर प्रथमच वर्गात प्रवेश करू शकतील. कारण पालकांनी आपली चिंता बाजूला ठेऊन संसर्ग वाढत असतानाही अधिकाधिक शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांना हिरवा कंदील दिला आहे. कमीत-कमी आणखी 6 राज्यांतील शाळा आणि महाविद्यालये सप्टेंबरमध्ये आरोग्य उपायांसह हळूहळू पुन्हा सुरू होतील.
(हेही वाचाः सकारात्मक बातमी! राज्यात नवीन रुग्णांच्या संख्येत बरीच घट!)
Join Our WhatsApp Community