शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर-माहिम विधानसभा क्षेत्रात मनसेला चितपट देत सदा सरवणकर यांनी हा गड पुन्हा राखला. परंतु याच ‘सदा’पुढे पक्षातून आव्हान उभे केले जात आहे. सरवणकर हे जुने शिवसैनिक असले, तरी शिवसेना नेते आणि युवा सेना अध्यक्ष तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पक्षात तरुणांची एक फळी निर्माण करायची आहे. त्यामुळे मनविसेचे अध्यक्ष असलेल्या आदित्य शिरोडकर यांना शिवसेनेत घेतल्यानंतर त्यांना पुण्याचे सहसंपर्क प्रमुख बनवले असले, तरी त्यांच्यावर दादरचीही जबाबदारी सोपवली. त्यामुळे आदित्य यांनी दादरमध्येही कार्यक्रम घ्यायला सुरुवात करत अप्रत्यक्ष सदा सरवणकर यांच्यापुढे आव्हान निर्माण केल्याची बोलले जात आहे.
आदित्य शिरोडकरांचे दादर-माहिममध्ये कार्यक्रम!
मागील काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असलेल्या आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर पक्षाने त्यांच्याकडे अधिकृतपणे पुण्याचे सहसंपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. आदित्य शिरोडकर हे मनसेमध्ये असताना दादर-माहिममध्ये कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम राबवला नाही. परंतु शिवसेनेत गेल्यानंतर प्रथमच त्यांनी दत्ता राऊळ मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने मोफत लसीकरण शिबिर आयोजित केला आहे. या लसीकरणाचा कार्यक्रम हा आदित्य राजन शिरोडकर यांच्या सौजन्याने होत आहे. शिरोडकर यांनी शिवसेनेच्या बॅनरवर जरी हा कार्यक्रम घेतला नसला तरी मंडळांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली आहे. आणि ही विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्यासाठी धोक्याची घंटी असल्याची चर्चा दादरमध्ये ऐकू येवू लागली आहे.
(हेही वाचा : मनोरुग्ण, बेघरांच्या लसीकरणावर उच्च न्यायालय का आहे असमाधानी?)
आदित्य शिरोडकर यांनी लढवलेली लोकसभा!
आजवर दादरमध्ये सदा सरवणकर हे आमदार असले तरी २००९मध्ये आदेश बांदेकर यांना शिवसेनेने तिकीट दिल्याने सरवणकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी मतांची विभागणी होवून मनसेचे नितीन सरदेसाई निवडून आले होते. त्यानंतर पुन्हा शिवसेनेत परतल्यानंतर सदा सरवणकर हे सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर आदित्य शिरोडकर यांनी २०१४मध्ये झालेल्या मनसेच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक दक्षिण मध्य मुंबईतून लढवली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. पण त्यानंतर त्यांनी कुठलीही निवडणूक लढवली नव्हती.
आदित्य शिरोडकरांची दादर-माहिममध्ये ‘तयारी’ सुरु!
आमदार सदा सरवणकर यांना पक्षांतर्गत मोठा विरोध असून पक्षातील काही नगरसेविका व नगरसेवक त्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे सरवणकर यांना पत्ता कापायचा झाला तर पर्याय म्हणून विशाखा राऊत यांचे नाव पुढे येते. परंतु विशाखा राऊत यांची प्रकृती ठिक नसल्याने तसेच तरुण वर्गातील पिढीला वाव देण्यासाठी मनविसेतून शिवसेनेत आलेल्या आदित्य शिरोडकर यांचा पर्याय निवडण्याचा विचार सुरु केला आहे. पक्षातील काही नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य शिरोडकर हे दादर-माहिम विभाग ज्ञात असून त्यांनी काम केलेले आहे. आदित्य ठाकरे यांच्या सोबतच्या दुसऱ्या फळीतील नेतृत्वाला साजेसे असे हे व्यक्तिमत्व असल्याने त्यांना पुण्यासह दादरकडेही लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात सरवणकर यांना तिकीट नाकारले तरी मनसेपुढे आदित्य शिरोडकर यांचे आव्हान उभे केले जाऊ शकते. त्यामुळे त्यांनी आतापासून शिवसेनेच्यावतीने पुन्हा मंडळांमध्ये आणि पक्षांच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे.
Join Our WhatsApp Community