सरकारने आतापर्यंत अनेकवेळा ‘फेरीवाला धोरण’ जाहीर केले आहे. पण असे धोरण वगैरे न करता एक स्वतंत्र फेरीवाला कायदा तयार करून एक स्वतंत्र खाते तयार करावे. केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु, मध्यम खात्याच्या धर्तीवर सरकारने फेरीवाला खाते तयार करून या खात्याचा फेरीवाला मंत्री तयार करावा, अशी मागणी माजी पोलिस अधिकारी ऍड. विश्वास काश्यप यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. असे केल्यास वाढत्या फेरीवाला समस्येवर नियंत्रण राहील आणि याची जबाबदारी संबंधित मंत्र्यांवर निश्चित करता येईल,असेही त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.
अनधिकृत फेरीवाल्यांना विरोध हा झालाच पाहिजे!
मुंबईसह अनेक शहरांमध्ये फेरीवाला समस्या जटील होत चालली असून ठाणे महापालिकेच्या महिला सहायक आयुक्त यांच्यावर हल्ला करून त्यांच्या हाताची बोटे छाटण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. फेरीवाल्यांवर महापालिकेची दिखाऊपणाची कारवाई केली जाते आणि यासाठी बनवलेले धोरण तर लाल फितीत अडकवून ठेवत त्यांचा धंदा सुकर करण्याचा प्रयत्न महापालिका आणि पोलिस यांच्याकडून केले जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी पोलिस अधिकारी असलेल्या ऍड. विश्वास काश्यप यांचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या निवेदनात काश्यप यांनी, घटनेनुसार उपजीविकेचा अधिकार सगळ्यांना आहे. तसाच फुटपाथवर चालण्याचा पादचाऱ्यांना सुद्धा आहे. अधिकृत फेरीवाल्यांना विरोध नाही, पण अनधिकृत फेरीवाल्यांना विरोध हा झालाच पाहिजे, असे म्हटले आहे.