दहशतवादी जान महंमदचे कुटुंबीय ताब्यात! रात्री उशिरापर्यंत कसून तपासणी 

144

देशात घातपाताचा मोठा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश आणि राजस्थान येथून ६ आतंकवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. या घातपाताच्या कटात अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आलेले असून अटक करण्यात आलेल्या ६ दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी जान महंमद हा मुंबईतील सायन धारावी झोपड्पट्टीत राहणारा असल्याची माहिती समोर आल्याने आता याचे मुंबई कनेक्शन उघडकीस आले आहे. त्यामुळे पोलिस तात्काळ जान महंमदच्या घरावर धडकले आणि त्याची पत्नी आणि २ मुली यांना ताब्यात घेतले, रात्री उशिरापर्यंत धारावी पोलिस ठाण्यात त्यांची कसून तपासणी सुरु होती.

अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त करण्यात आली असून या आतंकवाद्यांच्या निशाण्यावर देशातील प्रमुख शहरे आणि तेथील धार्मिक स्थळे होती, अशी माहिती उघडकीस आली आहे. जान महंमद शेख उर्फ  समीर कालिया अली मोहम्मद शेख (४७), ओसामा सामी  रहमान (२२), मूलचंद साजू उर्फ लाला ओमप्रकाश श्रीवास्तव (४७), जीशान कमर कामरु जमान (२३), मोहम्मद अमीर जावेद अस्लम जावेद बेग (३१) आणि मोहम्मद अबू बकर मोहम्मद सुन्ना खान (२३) अशी अटक करण्यात आलेल्या ६ आतंकवाद्याची नावे आहेत.

दिल्ली पोलिसांनंतर मुंबई पोलिसांची चौकशी 

जान मोहम्मद उर्फ समीर कालिया यांच्या कुटुंबीयांकडे चौकशी आणि घराची झडती घेण्यासाठी दिल्ली पोलिसांचे एक पथक मंगळवारी दुपारी मुंबईत दाखल झाले. मुंबई पोलिसांना कुठलीही प्रकारची माहिती न देता अथवा त्यांना सोबत न घेता हे दिल्ली पोलिस पथक दुपारी सायन धारावी येथील सोशल नगर झोपटपट्टीत जान महंमदच्या घरी दाखल झाले. या पथकाने जान महंमदच्या कुटुंबीयांची चौकशी करून काही महत्वाचे पुरावे सोबत घेऊन निघून गेले. दिल्लीत पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी  एक जण मुंबईतील सायन येथे राहणारा असून दिल्ली पोलिस मुंबईत दाखल झाल्याची माहिती मुंबई पोलिसांना उशिरा कळाल्यानंतर धारावी पोलिस, मुंबई गुन्हे शाखेचे पथके एटीएसचे पथके जान महंमद उर्फ समीर कालियाच्या घरी चौकशीसाठी दाखल झाले असून त्याच्या कुटुंबियांची मुंबई पोलिस आणि एटीएसकडून चौकशी सुरु झाली.

(हेही वाचा : देशातील दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! मुंबई कनेक्शन उघड)

जान महंमद हा अनिस इब्राहिमच्या थेट संपर्कात! 

जान महंमद उर्फ समीर कालिया हा मुंबईतील सायन पश्चिम एम जी रोड, केलाबखार येथील सोशल नगर झोपडपट्टीत कुटुंबियांसह राहण्यास होता. जान महंमद उर्फ समीर कालिया याला दिल्ली पोलिसांनी राजस्थान मधील कोटा येथून अटक केली असून त्या ठिकाणी तो लपून बसला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जान महंमद उर्फ समीर कालिया हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्या थेट संपर्कात होता, तसेच या कटातील महत्वाची जबाबदारी जान महंमद उर्फ समीर कालिया याच्यावर सोपवण्यात आलेली होती. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सर्वात पहिली अटक जान महंमद याला केल्यानंतर इतर दहशतवाद्यांना दिल्ली, उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली आहे.

जानने पाकिस्तानातून आलेला शस्त्रसाठा ताब्यात भारतात पोहचवला!

देशातील प्रमुख शहरामध्ये घातपात घडवून आणण्यासाठी हे सहा जणांचे मोड्यूल् तयार करण्यात आले होते. या मॉड्यूलला स्लीपर सेल ऑपरेटिव्हकडून अत्याधुनिक आरडीएक्स, आयडी, ग्रेनेड, पिस्तूल आणि काडतुसे मिळाली होती आणि ही शस्त्रे आणि दारुगोळा उत्तर प्रदेशात ठिकाणी सुरक्षित ठिकाणी लपविण्यात आली होती, असे चौकशीत उघडकीस आले आहे. या मोड्यूलमधला अंडरवर्ल्डचा ऑपरेटिव्ह जान महंमद उर्फ समीर कालिया आणि मुलचंद साज या दोघांनी पाकिस्तानात असलेल्या अनीस इब्राहिमच्या इशाऱ्यावर हा दारुगोळा आणि शस्त्रे दिल्ली येथे ताब्यात घेतली होती. हा दारुगोळा आणि शस्त्रे  दिल्ली, मुंबई आणि देशातील इतर महत्वाच्या शहरामध्ये असलेल्या आतंकवाद्यांना घातपातासाठी देण्यात येणार होते, अशी माहिती तपासात समोर आल्याचे  दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकातील अधिकारी यांनी दिली. आयईडी या स्फोटकाच्या पुढच्या खेपेची डिलेव्हरी विविध चँनेलद्वारे केली जाणार होती. पाक पुरस्कृत आयएसआयच्या आदेशावरून अंडरवर्ल्डला ही दोन कामे सोपवण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.