गणपती विसर्जनावेळी काहीजण पाण्यात वाहून गेल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. परंतु, गणपती बाप्पाबरोबर त्याच्यासाठी बनवलेला सोन्याचा मुकुट पाण्यात वाहून गेल्याची घटना विरळच. वसईत बाप्पाचे विसर्जन करताना चक्क साडेपाच तोळ्यांचा सोन्याचा मुकुटसुद्धा विसर्जन केल्याची घटना घडली. पण पट्टीच्या पोहणाऱ्याने मुकुट तलावातून शोधून काढत वाहवा मिळवली.
काय झाले नेमके?
वसईतील पाटील कुटुंबीयांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात बाप्पाची प्रतिष्ठापना केली होती. पण घरी सूतक लागल्यानं त्यांना पाच दिवसांच्या बाप्पाचे दीड दिवसांत विसर्जन करावे लागले. विसर्जनावेळी घाईघाईत साडेपाच तोळ्यांचा सोन्याचा मुकुट देखील त्यांच्याकडून विसर्जित झाला.
(हेही वाचाः तिने दात घासायला घेतले आणि मोरीतच कोसळली! असे काय घडले तिच्यासोबत?)
पाऊण तास शोध
रविवारी तलावात मुकुटाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला. यादरम्यान विवेक पाटील यांनी पाणजू येथील मच्छीमारांची मदत घेण्याचे ठरवले. विरार येथील पट्टीचे पोहणारे सदानंद भोईर हे त्यांच्याच गावातील एका नातलगाकडे आल्याची माहिती त्यांना मिळाली. लागलीच त्यांनी सदानंद यांच्याशी संपर्क साधत तलावातील मुकुट शोधून देण्याची विनंती केली. भोईर यांनीही तलावातील पाण्यात जवळपास पाऊण तास शोध घेतल्यानंतर पाटील कुटुंबीयांच्या गणपतीचा मुकुट शोधून काढला.
16 तासांनंतर सापडला मुकुट
तलावात 16 फूट पाणी, दीड फूट गाळ व दिड दिवसांचे तब्बल 96 गणेशमूर्तींचे विसर्जन झालेले असतानाही, त्यांनी अचूकपणे पाटील कुटुंबीयांचा गणपती व त्यावरील असलेला मुकुट पाण्यातून शोधून वर आणला. बाप्पासोबत विसर्जन झालेला सोन्याचा मुकुट जवळपास सोळा तासानंतर पुन्हा पाटील कुटुंबीयांच्या हाती लागल्यामुळे बाप्पानेच आपल्याला रिटर्न गिफ्ट दिल्याची भावना पाटील कुटुंबीयांकडून व्यक्त केली.
(हेही वाचाः ‘या’ राज्यात ड्रोनद्वारे पुरवली जाणार लस… काय आहे उपक्रम?)
Join Our WhatsApp Community