मिलिंद नार्वेकर…शिवसेना सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक…मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे सर्वात विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. पण आता याच नार्वेकर यांच्यासाठी थेट उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्या फोननंतरच नार्वेकरांची तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.
राज्यातून नार्वेकरांची नियुक्ती
देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थान म्हणून तिरुमला तिरुपती देवस्थान ओळखले जाते. या देवस्थानाच्या ट्रस्ट सदस्यांच्या नियुक्तीसाठी देशभरातून मोठी चढाओढ असते. ट्रस्टच्या सदस्यांची यादी काल आंध्रप्रदेश सरकारने जाहीर केली. या यादीत देशभरातून 24 व्यक्तींची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्रातून या यादीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री थेट आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून ही नियुक्ती सुचवत असतात.
मिलिंद नार्वेकर यांची तिरुपती बालाजी देवस्थानाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. ही राजकीय नियुक्ती आहे. अशा प्रकारे नियुक्त्या केल्या जातात. उद्या आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिर्डीच्या साई संस्थानात त्यांच्या सदस्याला नियुक्त करण्याची मागणी करू शकतात. अशा प्रकारे देवस्थानांवरील राजकीय नियुक्त्यांचा हा प्रकार कालपर्यंत राज्यपातळीवर चालत होता, आता तो राष्ट्रीय पातळीवर होऊ लागला आहे.
– सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजपा
कोण आहेत मिलिंद नार्वेकर?
मिलिंद नार्वेकर हे मुळात शिवसैनिक होते. मालाडमधल्या लिबर्टी गार्डन भागातले एक गटप्रमुख अशी त्यांची ओळख. मात्र १९९२ च्या निवडणुकीआधी शाखाप्रमुख पद मिळावे म्हणून नार्वेकर मातोश्रीवर आले होते. तेव्हापासून ते आजतागायत ते मातोश्रीच्या जवळ आहेत. उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक ते शिवसेना सचिव असा त्यांचा प्रवास राहिला आहे.
Join Our WhatsApp Community