शिवसेना आणि भाजप एकत्र येणार का, अशी चर्चा कायम होत असते. मात्र जेव्हा जेव्हा ही चर्चा सुरु झाली, तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावर पडदा टाकला, परंतु शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आले. सकाळी पहिल्याच कार्यक्रमात भरगच्च व्यासपीठावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली, तेव्हा व्यासपीठावर उपस्थित केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहत व्यासपीठावर उपस्थितीत आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी…’ असे वक्तव्य केल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. अशा प्रकारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रथमच भाजपाला युतीसाठी ऑफर दिली.
रेल्वे ट्रॅक सोडून जात नाही!
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पाडले. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, एमआयएम खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी युतीचे संकेत देणारी एकामागोमाग एक वक्तव्ये केली.
त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, माझ्या राज्याच्या राजधानी आणि उपराजधानी जोडणारा लोहमार्ग मुंबई नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल, तर रावसाहेब मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्यासोबत आहे. मला रेल्वे का आवडते कारण रेल्वेला रूळ असतात, रूळ सोडून इंजिन कुठेही जात नाही. रुळ सोडून इकडे तिकडे कुठेही जाऊ शकत नाही. त्याला डायव्हर्जन मारलं तर आमच्या स्टेशनवर येऊ शकता, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यांनाही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली, तेव्हा दानवे म्हणाले की, राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते. ते २५ वर्षे आमच्यासोबत होते. त्यामुळे काही वेळ जाऊ द्यावा, सर्व सुरळीत होईल, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले.
(हेही वाचा : पंतप्रधान मोदींनी घेतलेले महत्वाचे ५० निर्णय जाणून घ्या)
एकनाथ शिंदेकडूनही युतीचे संकेत!
यानंतर शिवसेनेचे नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, मुखमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ मुख्यमंत्री नाहीत, तर ते पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचा आदेश हा पक्षाचा आदेश आहे. त्यामुळे राजकरणात काहीही होऊ शकते, हे सत्य आहे, असेही शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community