टीक-टॉक, इंन्स्टाग्राम, युट्यूब यांसारख्या विविध माध्यमांतून आजकाल अनेक जण स्टार होताना दिसत आहेत. लॉकडाऊनच्या काळात तर अशा स्टार्सना चांगलंच उधाण आलं होतं. प्रत्येक जण आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी आटापिटा करत आहेत. ही माध्यमं म्हणजे एक उत्पन्नाची साधनं झाली आहेत. पण देशाच्या केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा या माध्यमातून लाखो रुपये मिळतात, असं जर कोणी सांगितलं तर आश्चर्याचा धक्काच बसेल. पण ही माहिती दिली आहे ती खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी.
नितीन गडकरी हे देशातील अत्यंत लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा मितभाषी स्वभाव आणि मिश्कील बोलणं यामुळे ते गेले काही दिवस चांगलेच चर्चेत राहिले आहेत. पण नुसती चर्चाच नाही तर त्यांच्या या वक्तव्यांमुळे ते महिन्याला चार लाख रुपये कमवत आहेत, असे त्यांनी स्वतः एका कार्यक्रमात जाहीरपणे सांगितले. तसेच ही रक्कम आपण कोविड निधीसाठी दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
(हेही वाचाः व्यासपीठावर आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी! मुख्यमंत्र्यांची भाजपाला ऑफर)
कोविडने दिली देणगी
गुरुवारी मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गाच्या पाहणीवेळी एका कार्यक्रमात गडकरी बोलते होते. त्यावेळी त्यांनी अगदी सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे जनतेशी संवाद साधला. लॉकडाऊनमुळे जसे तोटे झाले तसेच काही फायदे सुद्धा नक्कीच झाले. लॉकडाऊनमध्ये आपण काय केलं याबाबत गडकरींनी भाष्य केलं. मला कोविडने दोन गोष्टी दिल्या. एकतर मला चांगला स्वयंपाक करता येऊ लागला आणि मी उत्तम शेफ बनलो. तसेच या काळात मी अमेरिका, न्यूझीलंड, जर्मनी यांसारख्या देशांत अनेक व्याख्यानं दिली. ही व्याख्यानं यू-ट्यूबवर पाहली जात आहेत. त्यामुळे या माध्यमातून मला दरमहा चार लाख रुपये मिळाले, जे मी कोविड निधीसाठी दिल्याचा मोठा खुलासा नितीन गडकरी यांनी केला आहे.
रस्त्याचे काम लवकरच पूर्ण
मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गाच्या कामासाठी जवळपास 95 हजार करोड खर्च केले जाणार आहेत. या रस्त्याचे काम मार्च 2023 पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वासही नितीन गडकरींनी यावेळी व्यक्त केला आहे.
(हेही वाचाः पंतप्रधान मोदींनी घेतलेले महत्वाचे ५० निर्णय जाणून घ्या)
Join Our WhatsApp Community