कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पाचवे सेरो सर्वेक्षण(रक्त नमुन्यांची चाचणी) करुन प्रतिपिंड(अँटिबॉडीज) शोधण्याबाबतचे सर्वेक्षण महापालिकेच्यावतीने करण्यात आले. सर्वेक्षणानुसार, एकूण ८६.६४ टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडीज आढळून आल्या आहेत. कोविड लसीकरण झालेल्या नागरिकांपैकी अँटिबॉडीज विकसित झालेल्यांची संख्या ९०.२६ टक्के तर लसीकरण न झालेल्यांपैकी ७९.८६ टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या आहेत. मागील सर्वेक्षणांच्या तुलनेत झोपडपट्टी तसेच बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये देखील अँटिबॉडीज विकसित होण्याचे प्रमाण वाढल्याचा निष्कर्षही यातून समोर आला आहे.
दरम्यान, प्रतिपिंड आढळले तरी ते किती प्रमाणात सुरक्षितता प्रदान करतील, याची वैद्यकीय हमी देता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी ढिलाई न दाखवता कोविड विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून मास्कचा योग्य उपयोग, हातांची नियमित स्वच्छता, सुरक्षित अंतर इत्यादी कोविड अनुरुप वर्तणुकींचे पालन करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात येत आहे.
(हेही वाचाः मुंबईत डेल्टा प्लस आहे का? जाणून घ्या…)
चार वेळा सेरो सर्वेक्षण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेद्वारे विविधस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सातत्याने करण्यात येत आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना कोविडच्या प्रसाराबाबत निश्चित अशी शास्त्रीय माहिती उपलब्ध करुन घेणे गरजेचे असते. याचाच एक भाग असलेल्या सेरो सर्वेक्षणामध्ये रक्त नमुने घेऊन त्यातून प्रतिपिंड (अँटिबॉडीज) अस्तित्वात आहेत किंवा कसे, याचा अभ्यास केला जातो. मुंबईतील नागरिकांची आतापर्यंत तीन वेळा सेरो चाचणी करण्यात आली आहे. तर एकदा लहान मुलांचे विशेष सेरो सर्वेक्षण असे एकूण चार वेळा सर्वेक्षण करण्यात आले आहे.
राबवले पाचवे सेरो सर्वेक्षण
या चार सर्वेक्षणांनंतर, कोविडच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रक्त नमुने विषयक सर्वेक्षण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त(पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दिले होते. त्यानुसार, दिनांक १२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये महापालिकेने पाचवे सेरो सर्वेक्षण राबवले. त्यातील निष्कर्ष आता जाहीर करण्यात आले आहेत. महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग, शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय यांच्या वतीने आणि एटीई चंद्रा फाऊंडेशन व आयडीएफसी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त सहकार्याने हे पाचवे सेरो सर्वेक्षण राबवण्यात आले.
(हेही वाचाः हुश्श्य! कोविड चाचण्या वाढल्या, तरी रुग्ण संख्या घटलेलीच!)
इतक्या नागरिकांचे झाले सर्वेक्षण
शास्त्रोक्तरित्या नमुना निवड पद्धतीचा (random sampling) वापर करुन वय-वर्ष १८ पेक्षा अधिक असलेल्या नागरिकांमध्ये हे सेरो सर्वेक्षण केले आहे. महापालिकेचे दवाखाने तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणा-या विविध समाज घटकांतील रुग्णांचा यामध्ये समावेश होता. अशा रितीने मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व २४ प्रशासकीय विभागांत मिळून एकूण ८ हजार ६७४ नागरिकांचे रक्त नमुने संकलित करुन त्याची चाचणी करण्यात आली. सर्वेक्षण केलेल्या नागरिकांची माहिती नोंदवण्यासाठी मोबाईल अॅप्लीकेशनचा उपयोग करण्यात आला. तसेच सर्वेक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांची संमती देखील घेण्यात आली.
महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह, लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या सामुदायिक औषधी विभागप्रमुख डॉ. सीमा बनसोडे-गोखे, सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुजाता बावेजा यांनी प्रमुख अन्वेषक म्हणून या सर्वेक्षणामध्ये योगदान दिले. तर सह-अन्वेषक म्हणून नायर रुग्णालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. जयंथी शास्त्री तसेच डॉ. पल्लवी शेळके, डॉ. श्रीपाद टाकळीकर, डॉ. डेस्मा डिसूझा, डॉ. किरण जगताप, डॉ. कल्याणी इंगोले यांनी योगदान दिले आहे. तसेच, एटीई चंद्रा फाऊंडेशन व आयडीएफसी इन्स्टिट्यूट यांचेदेखील या सर्वेक्षणास सहकार्य लाभले आहे.
(हेही वाचाः केईएम ४० रिक्तपदे भरणार कंत्राटी पध्दतीने: अर्ज प्रक्रिया सुरू)
Join Our WhatsApp Community