…तर सीबीआयच्या अधिकाऱ्यांना क्वारंटाईन व्हावं लागणार?

172

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला असून, या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचे पथक मुंबईत येणार आहे. मात्र या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक मुंबईत सात दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी आलं तर त्यांना क्वारंटाईन केलं जाणार नाही. मात्र, सात दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी सीबीआयचे अधिकारी मुंबईत आले तर त्यांना मुंबई महापालिकेला ईमेल करुन क्वारंटाईनमधून सूट मिळवण्यासाठी अर्ज कारावा लागेल. त्यानंतर आम्ही त्यांची क्वारंटाईन कालावधीतून सूट देऊ”, असं मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सांगितले आहे.

सुशांत प्रकरणाचा तपास दाभोलकर हत्या चौकशीप्रमाणे होऊ नये

दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासकार्याप्रमाणे याची परिणती होणार नाही, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करुन चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल असे शरद पवार म्हणालेत.

मुंबई पोलीस तपासाला सहकार्य करणार

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णय राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वागत केले असून, मुंबई पोलीस सीबीआयच्या तपासाला सहकार्य करेल असे अनिल देशमुख म्हणाले आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात कोणताही दोष आढळलेला नाही. मुंबई पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला असे अनिल देशमुख यांनी दिला आहे.

काय आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची बिहार सरकारची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कायम ठेवली. वडिलांच्या तक्रारीवरुन सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येसंदर्भात एफआयआर नोंदवण्याचा बिहार पोलिसांना हक्क असल्याचे न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या एकल खंडपीठाने म्हटले. बिहार पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर सर्वसमावेशक असल्याचे सांगत चौकशी सीबीआयला देण्याचे कोर्टाने मान्य केले. मुंबई पोलीस सक्षम असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारनेही हा तपास सीबीआयकडे सोपवण्यास विरोध दर्शवला होता.

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांना खटल्याच्या फाइल्स सीबीआयकडे सोपवण्याचे आणि आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. “सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी त्याचे पालन केले पाहिजे आणि मदत केली पाहिजे” असे खंडपीठाने म्हटले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदवण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही प्रकरणांचीही चौकशी करण्याचे निर्देशही कोर्टाने सीबीआयला दिले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीची याचिका फेटाळताना कोर्टाने हा आदेश दिला. ही एफआयआर पाटण्याहून मुंबईत हस्तांतरित करुन बिहार पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीला स्थगिती देण्याची मागणी रियाने केली होती. सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आपल्या मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप रियावर केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.