अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज साखर कारखान्यातही कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घोरपडे साखर कारखान्याप्रमाणेच भ्रष्टचार झाला आहे. त्यामध्ये ९८ टक्के पैसा हा मनी लॉण्डरिंगच्या माध्यमातून जमवण्यात आले आहेत, त्याची कागदोपत्री माहिती ईडीला पुरवण्यात येणार आहे. त्यामध्ये मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली यांचा प्रमुख सहभाग आहे, असा गंभीर आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत केला.
काय आहे नवा घोटाळा?
अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना अवसायनात काढण्यात आला. तेव्हा तो ज्या कंपनीला विकण्यात आला ती बिस्क इंडिया ही कंपनी आहे. या कंपनीचा प्रमुख मालक हे मतीन मंगोली हे आहेत. ते हसन मुश्रीफ यांचे जावई आहेत. या कंपनीतही कोलकाता येथील बंद पडलेल्या कंपन्यांच्या नावाने बोगस खाती तयार करण्यात आली. त्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात आले आणि गट बिस्क इंडिया कंपनीत वळते करण्यात आले. विशेष म्हणजे बिस्क इंडिया कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नाही. तरीही या कंपनीला हा कारखाना हस्तांतरित करण्यात आला. यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेने योग्य लिलाव केला नाही. त्यावेळी केवळ बिस्क इंडिया कंपनी ही एकमेव कंपनी कशी होती?, असा सवाल सोमय्या यांनी केला. मुश्रीफ आणि त्यांचा जावई यांनी मिळून हा १०० कोटींचा घोटाळा आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले. आता आपण पारनेर साखर कारखान्याचा घोटाळा बाहेर काढणार आहे, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संबंध असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याची पाहणी करणार आहे, असेही किरीट सोमय्या म्हणाले.
Join Our WhatsApp Community