लखोबा लोखंडे नावाने ट्विटर खाते चालवणाऱ्याला अटक करुन न्यायालयात आणल्यानंतर, शिवसैनिकांनी बेदम मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली. यावरुन आता भाजपा आमदार आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली असून, राज्यकर्ते अराजकता माजवत असल्याची त्यांनी म्हटले आहे.
काय आहे लखोबा लोखंडे प्रकरण?
गेल्या अनेक दिवसांपासून लखोबा लोखंडे या फेसबूक पेजवरुन सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाईची मागणी केली होती. तसेच ‘मला पकडून दाखवल्यास 100 कोटी रुपयांचे बक्षीस देणार’, असे चॅलेंज देणाऱ्या या पेजचा चालक अभिजीत लिमये याच्या पुणे सायबर क्राईमने मुसक्या आवळल्या होत्या. सांगली येथून 18 सप्टेंबर रोजी त्याला ताब्यात घेण्यात आले.
(हेही वाचाः राज्य अराजकतेकडे… शेलारांचा ठाकरे सरकारवर आरोप)
तोंडाला फासले काळे
मात्र ज्यावेळी लिमये याला पुणे येथे न्यायालयात हजर करण्यासाठी आणले होते, त्यावेळी राष्ट्रवादी युवकच्या व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या अभिजित लिमयेच्या तोंडाला काळे फासत त्याच्याकडून पुन्हा असे करणार नाही, असे वदवून घेतले. सोशल मीडियावर व्यक्त होताना प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु मोठ्या कष्टाने ज्या नेत्यांनी आपली कारकीर्द घडवली त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांचा असाच समाचार घेणार, असे या कार्यकर्त्यांनी सांगितले.
राज्यात दुर्दैवी चित्र
राज्यकर्ते अराजकता माजवत आहेत आणि जनता असहाय्य आहे. न्याय कुणाकडे मागावा, अशी स्थिती जनतेची आहे त्यामुळे पत्रकार, संपादक, बुद्धिजीवी वर्ग, सामान्य नागरिकांनी आता बोललं पाहिजे, असे आवाहन आमदार आशिष शेलार यांनी केले. राज्यात गेल्या काही दिवसांत असेच दुर्दैवी चित्र आहे. समाज माध्यमांंवर जे बोलले त्यांना मारण्यात आले, एका निवृत्त नौदल अधिकाऱ्यांचा डोळा फोडण्यात आला, सरकार विरोधात बोलले म्हणून एका संपादकांना घरात घुसून अटक करण्यात आली, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे बोलणे दखलपात्र गुन्हा करुन त्यांना अटक करण्यात आली. दहशतवादी कारवाया राज्यात होतात त्याची माहिती पोलिसांकडे नाही. हे सर्व पाहिले की, राज्य अराजकतेकडे जात आहे आणि ती राज्यकर्तेच माजवत आहेत. कायदेशीर मार्गाने तक्रार करणाऱ्या नागरिकांना अटकाव केला जात आहे, असे देखील शेलार म्हणाले.
(हेही वाचाः भाजपा नेत्यांचे ‘ब्लॅकमेल’ करण्याचे काम सुरू- नाना पटोले)
Join Our WhatsApp Community