अफगाणिस्तान हा मागच्या काही दिवसांपासून जगात चर्चेचा विषय असलेला देश आहे. देशात माजलेली अराजकता, तालिबानी राज्यं याने होरपळून निघालेले अफगाण नागरिक यासंदर्भातील बातम्या आपण सतत ऐकत आणि बघत होतो. पण पुन्हा एकदा या देशाचे नाव भारतात चर्चिले जात आहे.
अफगाणिस्तानातून 2.8 अब्ज डॉलर्स (21,000 कोटी रुपये) किंमतीचे जवळपास तीन टन हेरॉईन अदानी समुहाच्या मुंद्रा बंदरातील दोन कंटेनरमधून जप्त करण्यात आले आहे. अफगाणिस्तान जगातील सर्वात मोठा हेरॉईन उत्पादक आहे, जो जागतिक उत्पादनाच्या 80-90% हेरॅाईनचा जगभरात पुरवठा करतो.
(हेही वाचाः राज्यात महिला सुरक्षित? गेल्या काही दिवसांत घडल्या ‘इतक्या’ बलात्काराच्या घटना)
पावडरच्या डब्यांत हेरॉईन
सध्या तालिबानच्या अधिपत्याखाली असलेल्या अफगाणिस्तानातून निघालेला हा माल इराणच्या बंदर अब्बास बंदरातून 13-14 सप्टेंबरला गुजरात येथील मुंद्रा बंदरात पाठवण्यात आला होता. मुंद्रा बंदराचे व्यवस्थापन करण्याचे काम अदानी ग्रुप करत आहे. आंध्र प्रदेशातील एका फर्मने आयात केलेल्या अफगाण टॅल्कम पावडरच्या कंटेनरमध्ये हे हेरॉईन लपवले होते. डीआरआयने 16 आणि 17 सप्टेंबर रोजी कंधारमधील एका कंपनीने निर्यात केलेल्या दोन कंटेनरचा गुप्त माहितीच्या आधारे शोध घेतला. त्यात एका कंटेनरमध्ये दोन बॅगमध्ये पॅक केलेले 1 हजार 999.58 किलो हेरॉईन आणि एका बॅगमध्ये 988.64 किलो हेरॉईन सापडले. सुरक्षा अधिका-यांना संशय येऊ नये म्हणून टॅल्कम पावडरमध्ये लपवण्यात आले होते.
कसून चौकशी सुरू
या प्रकरणात चेन्नईच्या एका जोडप्याला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्ली क्षेत्रातील अनेक अफगाण नागरिकांना एजन्सींनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तालिबान-आयएसआय यांच्याशी काही संबंध असण्याची शक्यता असल्याने त्यांची कसून चौकशी केली जात आहे. अलिकडच्या काळात अफगाणिस्तानमध्ये हेरॉईनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये सत्तेत परतलेल्या तालिबान्यांना निधी मिळण्यास मदत झाली आहे.
(हेही वाचाः ‘ब्रिक्स’मध्ये अफगाणिस्तानवर चर्चा! काय म्हणाले व्लादिमीर पुतीन?)
Join Our WhatsApp Community