कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या पहिल्या लाटेमध्ये जिथे महापालिकेने १८२ हॉटेल्सची मदत घेतली होती, तिथे दुसऱ्या लाटेमध्ये २३४ हॉटेल्स ताब्यात घेण्यात आले होते, या हॉटेल्स ताब्यात घेतल्यामुळे वेलनेस पॅकेजअंतर्गत त्यांच्या मालमत्ता कराची रक्कम आरोग्य खात्यातील अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागवण्यात येणार आहे. फेब्रुवारी ते मे २०२१ या चार महिन्यांसाठी ४१.८७ कोटी रुपयांच्या मालमत्ता कराचे अधिदान करनिर्धारण व संकलन विभागाला आरोग्य खात्याच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे हॉटेलकडून आकारण्यात येणाऱ्या बिलातून मालमत्ता कराची ही रक्कम कापून आरोगय विभाग करनिर्धारण व संकलन विभागाच्या खात्यात जमा करणार आहे. त्यामुळे पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत लॉकडाऊनच्या काळात हॉटेल्सची चंगी झाल्याचे दिसून येत आहे.
वेलनेस पॅकेज जाहीर करण्यात आले!
संपूर्ण महाराष्ट्रात व देशात कोरोना विषाणूंच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सुरु असताना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुंबईमध्ये १ फेब्रुवारी ते ३१ मे २०२१ पर्यंत कोविड १९च्या दुसऱ्या लाटेतील कोराना-१९ बाधित रुग्णांच्या विलगीकरणासाठी मुंबईतील काही हॉटेल्स महापालिकेच्यावतीने ताब्यात घेण्यात आली होती. महापालिकेने याकरता ठरवून दिलेल्या दरामध्ये हॉटेल व्यावसायिकांनी आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान विमानतळावर करण्यात आलेल्या संस्थात्मक क्वारंटाईन आणि कोविड-१९च्या रुग्णांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी विलगीकरण कक्ष स्थापनेसाठी रुग्णालयांमार्फत स्टेप डाऊन फॅसिलिटीकरता हॉटेल उपलब्ध करून दिली. कोविड – १९च्या प्रादुर्भावाची साथ अत्युच्च टप्प्यात असताना हॉटेल व्यवसायिकांच्या सहभागामुळे विलगीकरण सुविधा नागरिकांना पुरवणे महापालिकेला शक्य झाल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे ताब्यात घेतलेल्या हॉटेल्सच्या चार महिन्याच्या कालावधीतील मालमत्ता कराची रक्कम आरोग्य खात्यातील अर्थसंकल्पातील तरतुदीतून वळती करण्याबाबत वेलनेस पॅकेज जाहीर करण्यात आले होते.
(हेही वाचा : सोमय्यांकडून माफी नाहीच! अनिल परबांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल)
२३४ हॉटेलांची वार्षिक मालमत्ता कराची एकूण रक्कम १२२ कोटी रुपये अपेक्षित
मागील वेळेस या पॅकेज अंतर्गत एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांच्या कालावधीकरता १८२ महिन्यांच्या कालावधीसाठी मालमत्ता अथवा त्यांच्या भागाच्या एकूण मागणी रकमेपैकी मालमत्ता कराची रक्कम आरोग्य खात्यातून वळती करण्यात आली होती. विभागनिहाय व भूसंपादन संचालक यांच्या यादीनुसार प्राप्त झालेल्या यादीनुसार २३४ मालमत्ता वेलनेस पॅकेजचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहे. त्यामुळे सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीची या २३४ हॉटेलांची वार्षिक मालमत्ता कराची एकूण रक्कम १२२ कोटी रुपये अपेक्षित असून त्यातील फेब्रुवारी ते मे २०२१ या कालावधीतील मालमत्ता कराची रक्कम ४१.८७ कोटी रुपये एवढी आहे.
Join Our WhatsApp Community