काही महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांच्यात अर्धा तास खासगीत चर्चा झाली. या चर्चेनंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकीय चर्चांना सुद्धा उधाण आलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट होणार आहे. त्यामुळे या भेटीत पुन्हा एकदा बंद दाराआड काही चर्चा होते का, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
हे आहे बैठकीचे मूळ कारण
नक्षलवादी कारवाया या कायमंच डोकेदुखीचा विषय ठरला आहे. याच मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी महत्त्वाची बैठक बोलावली असून, या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. वाढता शहरी नक्षलवाद हा बैठकीतील मुख्य विषय असणार आहे.
(हेही वाचाः भाजपाच्या निलंबित 12 आमदारांना निवडणूक आयोगाचा दिलासा! भाजपाला होणार फायदा)
नक्षलग्रस्त भागांच्या विकासाला प्राधान्य
महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भागांत होणा-या नक्षली कारवायांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत नक्षलग्रस्त भागांत विकासकामे करण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. नक्षली कारवायांमुळे राज्यातील नक्षली भांगाचा विकास संथ गतीने होत आहे, त्यामुळे यावर तोडगा काढणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्यासोबत होणारी बैठक महत्त्वाची असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश राजभवनात का अडकणार? जाणून घ्या)
Join Our WhatsApp Community