यापुढे आता तुमच्या घराशेजारी असलेल्या शिधावाटप कार्यालय अर्थात रेशनिंगचे दुकान तुमच्यासाठी अधिक फायद्याचे ठरणार आहे. त्याला कारणही तसे आहे. केंद्र सरकारने आता रेशनिंगच्या दुकानाच्या कार्यकक्षा बऱ्याच रुंदावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या कार्यालयात नुसते धान्य मिळणार नाही, तर चक्क पासपोर्ट, पॅनकार्ड मिळणार आहे. तसेच याच दुकानात विजेचे आणि पाण्याचे देयकही भरता येणार आहे.
दुकाने बनणार सर्वसाधारण सेवा केंद्रे
सर्वसामान्य नागरिकांच्या घराजवळ अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व रेशन दुकाने आता कॉमन सर्व्हिस सेंटर बनवली जाणार असून अऩेक सुविधा नागरिकांना या ठिकाणी पुरवण्यात येणार आहेत. अन्न मंत्रालयाच्या कक्षेत रेशन धान्याची दुकाने येतात. या मंत्रालयाने ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेडसोबत एकत्र येत ही योजना तयार केली आहे. यामुळे रेशन दुकानांचे उत्पन्न वाढायलाही मदत होणार आहे. रेशन दुकानातून धान्य खरेदी करतानाच नागरिक पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्जही भरू शकणार आहेत. वीज आणि पाण्याचे देयकेही स्वीकारली जाणार आहेत.
(हेही वाचा : ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश राजभवनात का अडकणार? जाणून घ्या)
दुकानदाराला स्वातंत्र्य
रेशन धान्य दुकान चालवणाऱ्या दुकानदारांना कुठल्या सुविधा पुरवायच्या, याची निवड करता येणार आहे. सीएससीअंतर्गत विविध सुविधा पुरवल्या जाणार असल्या तरी आपल्याला योग्य वाटतील अशा सेवांसाठी रेशन दुकानदार अर्ज करू शकतील. सर्वच्या सर्व किंवा काही निवडक सुविधा आपल्या दुकानात उपलब्ध करून देण्याचा पर्याय रेशन दुकानदारांसमोर असणार आहे.
Join Our WhatsApp Community