सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या समस्या सत्तेच्या खुर्चीवर बसणा-यांना कधीच कळणार नाहीत, असा सूर अनेकदा सर्वसामांन्यांकडून ऐकायला मिळतो. परंतु केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी हे खोटे ठरवत सामान्य माणसाच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी चक्क सामान्य माणसाचा वेश धारण करत दिल्लीतील एका सरकारी रुग्णालयाला अचानक भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत जे घडले ते अकल्पनीय आणि धक्कादायक होते.
सरकारी रुग्णालयांची खरी स्थिती जाणून घेण्यासाठी आपण दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयाला सामान्य माणसाच्या वेशात भेट दिली. त्यावेळी आपल्याला तेथील सुरक्षा रक्षकाने धक्का दिल्याची खळबळजनक माहिती आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली. सफदरजंग रुग्णालयातील 4 नवीन आरोग्य सुविधांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
(हेही वाचाः लवकरच लसींची निर्यात पुन्हा सुरू होणार)
रुग्णालय प्रशासनाची केली कानउघडणी
यावेळी बोलताना त्यांनी आपल्या या भेटीत आलेले अनुभव सांगितले. अनेक रुग्णांना रुग्णालयात स्ट्रेचर आणि इतर वैद्यकीय मदत मिळण्यात अडचणी येत असल्याचे आपल्याला दिसून आले. त्यांनी एका 75 वर्षीय महिलेचे उदाहरण दिले, जी आपल्या मुलाकरिता स्ट्रेचर मिळवण्यासाठी रक्षकांकडे विनवणी करत होती, पण कोणीही तिच्या मदतीला आले नाही. रुग्णालयात 1500 गार्ड तैनात असतानाही महिलांच्या मदतीसाठी कोणीही का पुढे आले नाही, अशा शब्दांत त्यांनी रुग्णालय प्रशासनाची कानउघडणी केली. तसेच त्यांनी पॅरामेडिक्स आणि इतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भूमिकांची आठवण करुन देत त्यांना एक टीम म्हणून एकत्र काम करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान झाले अस्वस्थ
या घटनेबद्दल ऐकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अस्वस्थ झाले आणि त्यांनी संबंधित सुरक्षा रक्षकाला निलंबित केले आहे की नाही, असा प्रश्न आपल्याला विचारला. तेव्हा केवळ एक व्यक्ती नाही, संपूर्ण व्यवस्थाच बदलायची गरज असल्याचे मनसुख मांडवीय यांनी पंतप्रधानांना सांगितले.
(हेही वाचाः मुंबईतील मराठी मने(मते) जिंकण्यासाठी भाजपाचा ‘मराठी कट्टा’)
Join Our WhatsApp Community