भारतीय जनता पक्ष सध्या निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आंदोलन करत आहे. परंतु कोविड काळात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री व पालकमंत्री आदित्य ठाकरे हेच काम करत होते. कोविड काळात भाजपाला शिवसेनेनेच जगवले, असे सांगत महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष व शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांनी शिवसेनेमुळेच भाजपा असल्याचे सांगितले. कोरोनामध्ये जिथे रेल्वे बंद होत्या, तिथे बेस्ट आणि एसटी बसेस उपलब्ध करुन देत लोकांचे जीवन सुरळीत राखण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही तर भाजपाप्रणित सरकार असलेल्या राज्यांमधून आलेल्या नागरिकांना तसेच संशयित रुग्णांना मुंबईने स्वीकारुन त्यांच्यावर मोफत उपचार केले. त्यामुळे भाजपाने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार मानायला हवेत, असे सांगत त्यांनी भाजपाचा समाचार घेतला.
भाजपाचा पोटशूळ समजू शकतो
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असून, या निवडणुकीचा विचार करता भाजपा आता आक्रमक झाल्याचे दिसत आहे. बुधवारी भाजपाच्या नगरसेवकांनी महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महापौरांच्या कार्यालयाबाहेर सभागृह आणि समित्यांच्या सभा घेऊन पत्रकारांनाही प्रवेश देण्याची मागणी करत आंदोलन केले. भाजपाच्या या आंदोलनाचा समाचार घेत यशवंत जाधव यांनी भाजपाकडे आता कुठले मुद्देच राहिले नसल्याचे सांगितले. त्यांचा पोटशूळ काय तो आम्ही समजू शकतो, असे सांगत जाधव यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजपा ही आंदोलने करत आहेत असे म्हटले.
(हेही वाचाः शिवसेना आमदाराची भाजपा नगरसेविकेच्या वॉर्डात ढवळाढवळ)
पेंग्विनमुळे वाढला महसूल
कोरोना काळात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीच काम केले आहे. शहरातील पर्यटन वाढवण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे प्रयत्न करत आहेत. त्याचा रिझल्ट आता पाहायला मिळत आहे. त्यांच्या संकल्पनेतून राणीबागेत पेंग्विन आणून त्यांच्यासाठी कक्ष बनवला. आज त्यांना पाहण्यासाठीच जास्त पर्यटक येत आहेत. त्यामुळेच महापालिकेचा महसूल वाढत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तेव्हा भाजपा कुठे होती?
पदपथ आणि रस्ते विकासांची कामेही शिवसेनेने केली आहेत. हिंदमाता जवळ तुंबणाऱ्या पाण्यावर उपाय शोधून त्याचा निचरा करण्याची कायमस्वरुपी काम करण्यात येत आहेत. धारावी पॅर्टनची चर्चा जगभरात आहे. याचे श्रेय कुणाला जाते, असा सवाल करत जाधव यांनी कोरोना काळात भाजपाला जगवले असल्याचे सांगितले. लाईफलाईन असलेली रेल्वे लोकल सेवा बंद असताना बेस्टची बस सेवा सुरळीत सुरू ठेवली. पण भाजपाने कधी रेल्वे सुरू करण्यासाठी आंदोलने केली नाहीत. उलट स्वत: जीवनवाहिनी बंद ठेवली, पण आम्ही बेस्ट चालवून जनतेला सेवा दिली. मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री, आरोग्य मंत्री राजेश टोपे, शासनातील अधिकारी जेव्हा रस्त्यावर उतरुन काम करत होते, तेव्हा भाजपा कुठे होते, असाही सवाल यशवंत जाधव यांनी केला.
(हेही वाचाः मुंबईतील मराठी मने(मते) जिंकण्यासाठी भाजपाचा ‘मराठी कट्टा’)
भाजपाने मुख्यमंत्र्यांचे आभार मानायला हवे
उत्तर प्रदेशमध्ये कोविडच्या मृतांचे शव नदीत फेकले गेले, पण आम्ही तसे केले नाही. गुजरातहून, उत्तरप्रदेश, बिहारहून माणसे इथे येत होती. पण आम्ही त्यांना नाकारले नाही, तर उलट स्वीकारले. त्यांच्यावर मोफत उपचारही केले. ही सर्व राज्य भाजपाच्या ताब्यात असून त्यांच्या सरकारचे काम आमच्या मुख्यमंत्र्यांनी केले. त्यामुळे भाजपाने सर्वप्रथम आमच्या मुख्यमंत्र्यांचे आभारच मानायला हवे, असे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community