लुंगी उचलताच सापडला एक लाख बक्षीस असलेला आरोपी!

अब्दुल रजाक हा महाराष्ट्रातील ठाणे जिल्हा मुंब्रा परिसरात लपून बसला असल्याची माहिती यूपी एटीएसला मिळाली होती, त्याच्या शोधात एटीएसचे पथक ठाण्यात दाखल झाले.

130

उत्तर प्रदेशात गुन्हा करून ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे लपून बसलेला सराईत आरोपी लुंगी उचलताच सापडला. या आरोपीवर उत्तर प्रदेश सरकारने एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. महाराष्ट्र एटीएस आणि उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने एकत्रित ही कारवाई केली आहे. अब्दुल रजाक अब्दुल नबी मेमन (४०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अब्दुल रजाक यांच्यावर उत्तर प्रदेशात फसवणूक, बोगसपत्रे तयार करणे या गंभीर गुन्ह्याची नोंद झाली होती. अब्दुल रजाक याच्या शोधासाठी उत्तर प्रदेश एटीएसचे पथक तयार करण्यात आले होते. मात्र हा अब्दुल रजाक हा मिळाला नव्हता. अब्दुल रजाकला पकडून देणाऱ्याला उत्तर प्रदेश सरकारने १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश एटीएसची संयुक्त कारवाई

अब्दुल रजाक हा महाराष्ट्रातील ठाणे जिल्हा मुंब्रा परिसरात लपून बसला असल्याची माहिती यूपी एटीएसला मिळाली होती, त्याच्या शोधात एटीएसचे पथक ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर उत्तर प्रदेश एटीएसचे प्रमुख आणि महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख यांच्यात चर्चा होऊन यूपी एटीएस पथकाचे प्रमुख यांनी महाराष्ट्र एटीएस प्रमुख यांच्याकडे मदत मागितली. महाराष्ट्र एटीएस आणि यूपी एटीएस या दोन्ही पथकांनी संयुक्तपणे शोध घेतला असता अब्दुल रजाक हा मुंब्रा येथील ठाकुरपाडा येथील आनंद सहकारी भाडेकरू मालकी गृहनिर्माण सोसायटी येथे राहत्या घरात लपून बसला आहे, अशी माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली.

(हेही वाचा : मोदींना अमेरिकेत प्रवेश दिलाच कसा? नेटकऱ्यांनी प्रश्न विचारला)

अब्दुल रजाकला अटक करून उत्तर प्रदेशला नेले

एटीएसचे अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी अब्दुल रजाकचा शोध घेतला, मात्र तो घरात कुठेही मिळाला नाही. एटीएसचे पथक माघारी फिरणार तेवढ्यात एटीएसच्या एका पोलिस शिपायाला बाथरूमच्या पोटमाळ्यावर एक नवीन लुंगी दिसली व त्यांचा संशय बळावला. एटीएस पथकातील अधिकारी यांनी पोटमाळ्यावरील लुंगी उचलतात, लुंगीच्या आड लपलेला अब्दुल रजाक दिसला. एटीएसच्या पथकाने अब्दुल रजाक याला ताब्यात घेऊन यूपी एटीएसच्या ताब्यात दिले. यूपी एटीएसचे पथक अब्दुल रजाक याला अटक करून यूपीकडे रवाना झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.